पुणे, 23 एप्रिल : कोरोना महामारीमुळे साऱ्या आसमंतात रुग्णवाहिकेच्या सायरनचा गंभीर आवाज घुमत असताना धायरी येथील सिल्व्हर बर्च हॉस्पिटल या खासगी रुग्णालयातल्या कोरोना रुग्णांच्या कानावर मात्र बासरीचे मंजुळ स्वर ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे येथील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेला एक रुग्णच हे बासरीचे सूर छेडत होता. आता हे ऐकून काही क्षण का होईना पण तुम्ही चकीत झाला असाल ना? पण हे खरं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलो म्हणून काय झालं? व्हेंटिलेटरवर असलो म्हणून काय झालं..? जीवन जगण्याची दुर्दम्य आशा अजून सोडलेली नाही..! व्हेंटिलेटरवर असतानाही बासरीचे स्वर छेडत आपल्यासह इतरांना कोरोनाशी दोन हात करायला लावणाऱ्या एका वयोवृद्ध लढवय्याची ही स्वरमयी कहाणी… हे ही वाचा- अकोला : चक्क स्मशानभूमीत साजरा केला जातोय वाढदिवस, काय आहे कारण? अतिदक्षता विभागात बासरीचे स्वर छेडणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे पोपट कुंभार. गेल्या आठलडयात पोपट कुंभार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातच त्यांना न्यूमोनियानं ग्रासल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता ती आणखी खालावत गेली. अखेर त्यांचा मुलगा मारुती कुंभार यांनी नगरसेविका स्मिता कोंढरे यांचं जनसंपर्क कार्यालय गाठलं आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांना “काहीही करा पण माझ्या वडिलांचे प्राण वाचवा,” अशी विनंती केली. कोंढरे यांनी धायरी येथील खासगी रुग्णालय असलेलल्या सिल्व्हर बर्च या हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बेड उपलब्ध होताच पोपट कुंभार यांना तेथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या पोपट कुंभार यांनी मग उपचारातून थोडेसे बरे वाटताच आपल्याजवळील बासरी बाहेर काढली आणि हळूच सूर छेडायला सुरुवात केली. पाहाता पाहाता रुग्णालयातील वातावरण टेन्शन फ्री व्हायला लागलं आणि इतर रुग्णांच्या मनातील कोरोनाविषयीची भीतीही नाहीशी होऊ लागली. पोपट कुंभार यांनी योग्य उपचार आणि बासरीच्या मंजुळ स्वरांच्या माध्यमातून कोरोनावर तर मात केलीच पण ‘जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे’ हे गीत गाऊन आपल्यासह इतरांनाही जीवन जगण्याचा अनमोल संदेश दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.