गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (पुणे), 27 जून : प्राचीन काळात ज्या झाडाच्या पानावर गुप्त संदेश लिहून पाठवला जायचा ते अत्यंत दुर्मिळ असे सितापत्र नावाचे झाड पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आले आहे. बहुउपयोगी असूनही दुर्लक्षित असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या एका झाडाच्या संवर्धनासाठी पर्यावरण अभ्यासक जिवाचं रान करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परीसरात असलेल्या खान पट्ट्यातल्या डोंगरावर तग धरून उभे असलेले साधेसुधे दिसणारे हे झाड अत्यंत बहुगुणी आहे. या झाडाच्या पानावर कोणत्याही टोकदार वस्तूने लिहले की, काही क्षणातच अक्षरे उमटून येतात आणि ही अक्षरे चिरकाल टिकून राहतात.
रावणाच्या कैदेत असलेल्या सीता मातेने प्रभू श्री-रामचंद्र यांना पत्र लिहिण्यासाठी याच झाडाच्या पानाचा उपयोग केला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या झाडाला सितापत्राचे झाड म्हटले जाते. तर स्वातंत्र्य पूर्व काळातही आपल्या क्रांतीकारकांनी इंग्रजांविरुद्ध एकमेकांना गुप्त संदेश पाठविण्यासाठी याच झाडाच्या पानाचा उपयोग केल्याच्या नोंदीही आढळतात. मात्र, या ओळखी शिवायदेखील या झाडात अनेक गुण असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात. खरेतर एव्हढे गुणधर्म असूनही पर्यावरण विभागच दुर्लक्ष असल्याने या झाडाचा समावेश IUCN म्हणजेच वृक्ष आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या संकटग्रस्त यादीमध्ये करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर या झाडाचे संवर्धन जतन करण्याची जबाबदारी उद्यान विभागाची असते. मात्र, या विभागाकडूनही हे झाड दुर्लक्षित झालं असल्याचा दावा पर्यावरण प्रेमीनी केला आहे. याच झाडाच्या बाजूला एक भलं मोठं झाड होते. मात्र, ते बुडापासून कापून नेण्यात आलंय. आता हे एकमेव उरलेलं झाड तग धरून उभे आहे. या झाडाला तत्काळ संरक्षित केल्या गेले नाही. तर पुढच्या पिढीला या झाडाचे केवळ चित्र बघायला मिळेल आणि त्यांना आपल्याला या झाडाच्या कहाण्याच ऐकाव्या लागतील. असे होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग काही कठोर पाऊले उचलेल का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.