पुणे, 7 जुलै : सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असलेला प्राणी म्हणजे साप. शहरी किंवा ग्रामीण दोन्ही भागात सापाबद्दल अनेक गैरसमज आहेत. सापाच्या सर्वच जाती या विषारी नसतात, हे माहिती नसल्यानं अनेकजण साप दिसताच त्याला मारण्यासाठी धावतात. त्यामुळे सापाबद्दलची नेमकी माहिती माहिती होणं आवश्यक आहे. पुणे आणि परिसरात कोणते साप आढळतात? यामधील विषारी साप कोणते? याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्प अभ्यासक राजन शिर्के यांनी ही माहिती दिली आहे. नाग : हा फणा काढणारा साप आहे. त्याचबरोबर तो विषारी साप आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरातील वेगवेगळ्या भागात नाग आढळतो.
घोणस : या सापाची लांबी 3 ते 5 फूट एवढी असते. याचे डोके चपटे आणि त्रिकोणी असते. उंदीर तसंच लहान सस्तन प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे. शेतापासून वारूळा पर्यंत हा साप आढळतो. हा देखील विषारी साप आहे. धूळ नागीण : फिकट किंवा गडद तापकिरी रंगाचा हा साप आहे. बिळामध्ये तसेच दगडाच्या राशीत आढळते. ही बिनविषारी नागणी आहे. धामण : गवताळ प्रदेश आणि जंगलात धामण आढळते. उंदीर आणि बेडूक हे मुख्य खाद्य असलेली धामण बिनविषारी आहे. ‘जर्मन शेफर्ड’ खरंच शिकारीसाठी वापरला जातो का? तुम्हाला माहिती नसेल पण… दिवड : या सापाच्या अंगावर बुद्धिबळाच्या उंटासारखी चौकोनी नक्षी दिसून येते. मासे आणि बेडूक खाणारे हे साप देखील बिनविषारी आहेत. अजगर : अजगर देखील बिनविषारी आहे. अजगराची लांबी साधारण 15 फुटांपर्यंत असते. साप, उंदीर, घुशी अशा प्राण्यांपासून हरणासारखे काही मोठे प्राणी देखील अजगर खाऊ शकतात. जंगलापासून माळरानापर्यंत सर्वत्र अजगराचे वास्तव असते. साप हे माणसांना लगेच दंश करत नाही. ज त्यांना कोणी स्पर्श करेल किंवा मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच ते तुम्हाला इजा करू शकतात. सापांना कोणताही आवाज ऐकू येत नाही. त्यांना फक्त जमिनीची कंपनं समजतात, असं सर्प अभ्यासक राजन शिर्के यांनी स्पष्ट केलं.