लिपिकपदाच्या नियुक्तीसाठी एकाची आत्महत्या; पुण्यात 40 उमेदवारांचे साखळी उपोषण

लिपिकपदाच्या नियुक्तीसाठी एकाची आत्महत्या; पुण्यात 40 उमेदवारांचे साखळी उपोषण

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे राज्य शिक्षण मंडळाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे.

  • Share this:

पुणे, 7 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुण्यातील मुख्य इमारतीच्या गेटवर मंडळात कनिष्ठ लिपिकपदासाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने 2019 मध्ये कनिष्ठ लिपिकपदासाठी भरतीप्रक्रिया राबविली होती. 266 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नशिबी मात्र अजूनही प्रतीक्षाच आहे.

परीक्षा पास होऊन 18 महिने होऊन गेलेत त्यानंतरची अंतिम निवड चाचणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. परंतू अद्यापही नियुक्तीपत्र हाती मिळत नसल्याने हे सर्व उमेदवार हतबल झाले आहेत.  अशातच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद जिल्हयातल्या एका उमेदवाराने हवालदिल होत आत्महत्या केल्याचे प्रकरण नुकताच समोर आला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक मंडळाच्या या दप्तर दिरंगाई कारभाराविरोधात संताप व्यक्त करत उमेदवारांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.

कनिष्ठ लिपिकपदी निवड झालेले 40 उमेदवार मंडळाच्या इमारती बाहेर उपोषणाला बसले आहेत. शिक्षण मंडळाने 266 जागांच्या कनिष्ठ लिपिकपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये परीक्षा घेतली. डिसेंबरअखेर 1049 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. 7 फेब्रुवारी 2020 रोजी कागदपत्रांची पडताळणी करून मेरीटनुसार अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. तसेच 23 मार्च 2020 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ लिपिकपदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्य शिक्षण बोर्डाला कळविले.

हे ही वाचा-पुणे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद

मात्र, 18 महिने होऊनही नियक्तीचे आदेश न मिळाल्याने उमेदवारामध्ये संताप आहे आणि त्यामुळे चिडलेल्या या उमेदवारांनी आता सोमवार सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, पोलिसांनी जमाव बंदीचं कारण देत उपोषण करण्यास नकार दिला आहे. म्हणून मग अखेर पुणे बोर्डाकडून 20 दिवसात नियुक्तीपत्र देण्याचं आश्वासन देऊन हे आंदोलन गुंडाळण्यात आलं आहे. पण आगामी 15 दिवसात माध्यमिक बोर्डाने आम्हाला कामावर जॉईन करून घेतले नाहीतर आम्ही सर्व पीडित उमेदवार आमरण उपोषणाला बसू, असा इशारा आंदोलन कर्त्यांनी सरकारला दिला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 7, 2021, 7:45 PM IST

ताज्या बातम्या