जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण चर्चा केली असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

  • -MIN READ Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
  • Last Updated :

चिंचवड, 19 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. आधी 40 आमदार आणि 13 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता पक्ष आणि चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटलं आहे, त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत, पण काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विस्तृत बोलणं टाळलं. शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर मात्र त्यांनी भाष्य केलं आहे. ‘एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सत्तेत असल्याने आपल्यासोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे नाव नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणं ठाकरे यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पुढे काय घडतं याचं कुतूहल आपल्याला आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘जिथे जाईन तिकडे माझ्या मागे याल का?’, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसमोर सूचक विधान उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात यायची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते म्हणाले होते. शिवसेनेच्या या ऑफरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडे यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असले तरी त्या भाजपमध्येच राहतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्येही पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता, त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा आणखी वाढत गेल्या. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे, या विस्तारात पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांना पुढच्या 6 महिन्यांमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात