पुणे, 28 डिसेंबर : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गावची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच स्थरावरुन होत आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास गावाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देण्याचं आमिषही राजकीय नेत्यांकडून दाखवण्यात येत आहे. या सकारात्मक बदलासाठी आता वारकरी संप्रदायानेही पुढाकार घेतला आहे.
गावागावांत कीर्तन, प्रवचनातून समाज प्रबोधनाचे काम करणारा वारकरी संप्रदायसुद्धा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी पुढे आला आहे. शिरुर तालुक्यातील वारकरी संघटनेकडून गावकारभाऱ्यांसमोर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी तब्बल 5 वर्ष गावात मोफत कीर्तन सेवा करण्याची हमी शिरुर तालुका वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष नवनाथ महाराज माशेरे यांनी शिरुरच्या तहसीलदारांना दिली आहे.
हेही वाचा -अजितदादा पुन्हा भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ
कार्यक्रम विना मानधनाचे करणार असल्याचे हभप नवनाथ महाराज माशिरे यांनी जाहीर केले आहे. शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये शिरुर तालुका वारकरी संघटनेकडून भजनी मंडळ व दिंडी सोहळ्याला भजनी साहित्य मोफत देणार असून गावात 5 वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांत कीर्तन, प्रवचनाची सेवा विनामोबदला दिली जाणार आहे.
दरम्यान, जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन वारकरी संघटनेकडून करण्यात आलं आहे.