पुणे, 3 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातही गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. पुण्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं - पुणे शहरातील काही भागात देहव्यापारही सुरू आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार उघड झाले होते. यातच पुण्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर आता पुणे पोलिसांनी येथील वेश्या-व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवल्यावर छापा टाकत याठिकाणी कारवाई केली.
पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे अधिकारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांनी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या विशेष पथकाने वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन मुली आणि तीन दलालांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 370, 34 आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या कलमांखाली बंडगार्डन पोलीस ठाण्यात तीन एजंटांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. एकंदरीतच पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत आहे.