पुणे, 28 जानेवारी : कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले छत्रपती (sambhaji raje chhatrapati) यांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरीत येऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. यावेळी संभाजीराजे यांनी खंडा तलवार उचलून दाखवली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. संभाजीराजे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ते पत्नी संयोगीताराजे यांच्यासह देवदर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते. लग्नानंतर त्यांनी जेजुरीस भेट दिलेली नव्हती. आज कुलदैवताचे दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले. त्यांचा हा संपूर्ण दौरा खाजगी होता.
42 किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलून धरण्याची स्पर्धा भरवली जात असते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. आज ही खंडा तलवार जेजुरी गडावर पाहण्यास मिळते. दरम्यान, संभाजीराजे हे साताऱ्यात पार पडलेल्या अण्णासाहेब विकास फाऊंडेशन कार्यक्रमाला येऊ शकले नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आले होते. यावेळी, ‘मराठा मोर्चे आतापर्यंत अत्यंत शांतपणे निघाले आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाला वेगळी वागणूक देणे हे योग्य नाही. आम्हाला दुसऱ्याच आरक्षण काडून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही. जसं त्या समाजाला आरक्षण देण्यात आले, तसे आम्हालाही देण्यात यावे. आमच्यावरच अन्याय का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत केला. तसंच, ‘लोकांच्या भावना समजून घ्या, लोकांचा अंत पाहून नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण रोखणार आहे. मी तरी काय सांगणार आहे.आपल्या कुटुंबासाठी ही लोकं रस्त्यावर उतरली आहे’, असा इशाराही उदयनराजेंनी दिली.