पुणे, 14 जून : कोरोनाच्या काळात मानवी संवेदनांचे अनेक पदर दिसून येतात. अनेकजणांनी पदरमोड करून लोकांना मदत पोहोचवल्याचं आपण पाहिलं आहे. पण, पुण्यात एक अत्यंत लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. गरीब आणि गरजू लोकांनी असलेल्या अन्नधान्याची किट राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालय परिसरात असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना महापालिकेने रेशनिंगचे किट वाटण्यासाठी आणले होते. परिसरात गरजू लोकांना किट वाटप करण्यात आले होते. पण, यातून सुमारे 135 किट उरल्या होत्या. या किट सहकारनगर पोलीस ठाण्यासमोरील विणकर सभागृहात ठेवण्यात आले होते.
मात्र, काही स्थानिक पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 8 जूनच्या रात्री रिक्षा लाऊन मागच्या दरवाज्यातून हे सगळे किट पसार केले. महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरी कुणी केली हे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर परदेशी नावाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यााबतची लेखी तक्रार सहकारनगर पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या पत्राला ही वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. आणि गंमत म्हणजे त्याच रात्रीया अधिकाऱ्याला फोन वरून जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. हेही वाचा - लग्नाला जाण्यासाठी बंदूक साफ करत होते BJP नेता, अचानक सुटली गोळी आणि… स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर रविवारी रात्री अचानक चोरीला गेलेल्या सर्व किट विणकर सभागृहात परत ही आल्यात. विशेष म्हणजे, चोरीची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर याची माहिती चोरट्यांना मिळते आणि ते अधिकाऱ्यांना धमकी देता. जेव्हा प्रकरण अंगाशी येणार याची खात्री होते तेव्हा हे चोर परत किट आहे तशा आणून ठेवतात. या प्रकरणामागे नेमकं काय गौडबंगाल आहे ते समोर येणे गरजेचं आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी केली. संपादन - सचिन साळवे