पुणे, 20 ऑगस्ट : रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन (No Parking Zone) वाहतूक विभागाकडून (Traffic Department) तयार करण्यात येतात. या नो पोर्किंग परिसरात गाडी उभी असल्यास वाहतूक पोलीस टोईंग करतात आणि दंड वसूल करतात. मात्र, पुण्यातून आता एक अजब प्रकार समोर आला आहे. नो पार्किंगमधील बाईक वाहतूक पोलिसांनी थेट चालकासह टोईंग (Pune bike towing with rider by Traffic Police) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
वाहतूक पोलिसांनी पुण्यातील नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवले. ही घटना गुरूवारी पावणे-पाचच्या सुमारास घडली आहे. यावरून भारतात लोकशाही आहे की, तालिबानी कारभार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दुचाकी स्वारांना अडवून काही न काही कारणे सांगून अडविणे, त्यांच्याकडून वसुली करणे, हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता गुरूवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलीस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टोईंग व्हॅनमध्ये गाडी ठेवली.
यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे.
अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याच्या मेंदूला मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. तसेच, अशा मुजोर पोलिसांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे काय कारवाई करणार? हे आता पहावे लागणार आहे.