पुणे, 19 जानेवारी : सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात आता क्रीडा संस्कृती चांगलीच रूजली आहे. लवकरच शहरात आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. येत्या 21 ते 28 जानेवारी दरम्यान पुण्यात 40 हजार डॉलर रकमेची एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा होणार आहे. या वर्षी स्पर्धेची ही 22वी आवृत्ती असून भारतातील आघाडीच्या टेनिसपटू अंकिता रैना आणि करमन कौर थांडी यांच्यासह 15 देशांच्या खेळाडू खेळणार आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा आयोजित होणार आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील हार्ड टेनिस कोर्टवर 21 ते 28 जानेवारीदरम्यान स्पर्धेतील सर्व सामने खेळवले जातील.
"आयटीएफच्या पुढाकारांतर्गत $25K हा वार्षिक इव्हेंट $40Kमध्ये अपग्रेड करण्यात आला आहे. हे स्पर्धेचं एक नवीन स्वरूप आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडावी यासाठी डेक्कन जिमखाना येथे आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतीय टेनिस खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल. कारण, या स्पर्धेत त्यांना वुमेन टेनिस असोसिएशनचे (WTA) गुण मिळविण्याची संधी आहे," अशी माहिती ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे संयुक्त सचिव सुंदर अय्यर यांनी दिली.
उसेन बोल्टला मोठा फटका, आतापर्यंतची कमाई बँक खात्यातून गायब
स्पर्धेच्या रकमेत वाढ
या महिला टेनिस स्पर्धेचं 2001 साली 5 हजार डॉलर इतकं बक्षीस होतं. 2009 साली 10 व्या वर्धापन दिनानिमित्त याचे 50 हजार डॉलर बक्षीस होतं. 2010 पासून ते 2020 पर्यंत या स्पर्धेचं बक्षीस 2500 हजार डॉलर इतकं होतं.
"आम्ही पाच टेनिस कोर्ट पुन्हा उभारले आहेत. खेळाडूंना सर्वोत्तम जागतिक दर्जाच्या टेनिस सुविधा देण्यासाठी आयटीएफ मानकनांनुसार फ्लडलायटिंग अपग्रेड केलं आहे. यावर्षी, आयटीएफ वेबसाइटवर या स्पर्धेचं लाइव्ह स्ट्रीमिंगदेखील उपलब्ध केलं जाईल," अशी माहिती स्पर्धेचे संचालक अश्विन गिरमे यांनी दिली.
कुणी वैज्ञानिक तर कुणी शिक्षक, पार्ट टाइम हॉकी खेळून पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी पात्र
15 देशांचे खेळाडू सहभागी
या स्पर्धेत 15 देशांचे खेळाडू सहभागी होतील. जागतिक क्रमवारीत 68 व्या क्रमांकावर असलेली जर्मनीची तात्जाना मारिया, उझबेकिस्तानची निगीना अब्दुरेमोवा आणि स्वित्झर्लंडची जोआन झुगर या स्पर्धेच्या सीडिंग लिस्टमध्ये आघाडीवर असतील. प्रामुख्यानं परदेशी खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या मुख्य ड्रॉमध्ये अंकिता रैना आणि करमन कौर थांडी यांच्या व्यतिरिक्त चार भारतीय वाइल्डकार्ड खेळाडू प्रवेश करतील. आयटीएफनं या स्पर्धेसाठी गोल्ड बॅज रेफ्री शीतल अय्यर यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केली आहे.
एमा रॅडकॅन्यू, अरीना सॅबालेन्का, बोजाना जोव्हानोव्स्की, मॅग्डा लिनेट आणि कॅटेरिना बोंडारेन्को यांनी आतापर्यंत या स्पर्धेचं विजेतपद जिंकलेलं आहे. या सर्व खेळाडू डब्ल्यूटीए टूरमधील टॉप 20 खेळाडू बनलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Sports, Tennis player