पुणे, 22 जुलै: काही जण समाजातील प्रश्न दिसत असूनही न दिसल्यासारखे करून पाठ फिरवतात तर काही जण तेच प्रश्न डोळसपणे पाहून समाजाला दिशा देण्यासाठी थेट कृती करतात. पुण्यातील स्वाती कुलकर्णी याच डोळस व्यक्तींपैकी आहेत. अंध मुलींसाठी ‘डोळा’ बनून त्यांना रोजगार मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम स्वाती करत आहेत. दिव्यांग मुलींना स्वतः:च्या पायावर उभे करण्यासाठी एकही रुपया न घेता त्या कार्य करत आहेत. त्यांचे हे कार्य समाजाला आणि आपल्या प्रत्येकालाच एक नवी दृष्टी आणि नवी स्फूर्ती देणारे आहे. आठवीमध्ये असतानाच घेतला ध्यास स्वाती कुलकर्णी 2010 पासून दिव्यांग मुलींसाठी काम करत आहेत. स्वाती या आठवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्यासोबत दिव्यांग मुलीसुद्धा होत्या. तेव्हाच त्यांनी दिव्यांग मुलींसाठी जे शक्य असेल ते करायचे ठरवले. गांधीभवन कोथरूड पुणे येथील दिव्यांग मुलींच्या शाळेमध्ये दोन ते तीन तासासाठी जाऊन तेथील दिव्यांग मुलींना वाचून दाखवणे, मेणबत्ती तयार करण्यासठी मदत करणे, शिलाई मशीनवर टिप मारायला शिकवणे, पेपर बॅग तयार करायला शिकवणे अशाप्रकारे मदत करायला सुरुवात केली. याचबरोबर या अंध शाळेतून 4 वर्षांचे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलींना पुढे दहावी-बारावीच्या शिक्षणाच्या अभ्यासात मदत करणे, लेखनिक म्हणून पेपर लिहायला जाणे अशा कामांद्वारे आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.
कोणत्या गोष्टींचे प्रशिक्षण? दिव्यांग मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वाती या स्वतःच्या घरी त्यांना बोलावून विविध प्रकारच्या वस्तू बनवायला शिकवतात. यामध्ये मेणबत्त्या बनवणे, पेपरबॅग्ज तयार करणे, फ्रुटबास्केट आणि वायर बास्केट बनवणे या गोष्टींचे प्रशिक्षण देतात. याव्यतिरिक्त सिझनल वस्तू म्हणजेच दिवाळीनिमित्त पणत्या, चॉकलेट्स बनवणे, रक्षाबंधनाला राख्या तयार करणे, तुळशीवृंदावन बनवून रंगवणे, ख्रिसमससाठी जेल कँडल्स बनवणे आणि त्यातून स्वबळावर रोजगार निर्मिती करणे याचे धडे देतात. सध्या त्यांच्याकडे 5 ते 7 मुली काम करण्यासाठी येतात. रोजगाराची संधी शोधण्याचा माझा प्रयत्न मी दिव्यांग मुलींना कच्चा माल आणून देते आणि त्यांना विविध वस्तू बनवायला शिकवते. मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वस्तूंसाठी ग्राहक शोधतात. पुढे जाऊन त्यांच्याकडून खाण्याच्या गोष्टी बनवून रोजगाराची संधी शोधण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी माहिती स्वाती कुलकर्णी यांनी दिली.
‘ पुणे तिथे…’ किचन क्विनचा संपला काळ, आता व्हा किचन सम्राट, पुरुषांसाठी खास किचन क्लास!
कोथरूडच्या अंध शाळेमध्ये चार वर्षांचं ट्रेनिंग घेऊन 2014 मध्ये मी बाहेर पडले. सुरुवातीला मी कमावत नव्हते, परंतु नंतर स्वातीताईंशी बोलून मला रोजगाराची संधी मिळाली. माझे एम. ए. चे शिक्षण झाले आहे. मी आता वाघोली येथे स्नॅप पायावर कंपनीमध्ये काम करते आणि शनिवार आणि रविवार इथे काम करण्यासाठी येते, असे स्वाती यांच्याकडे काम करणाऱ्या मैना राजुरी या मुलीने सांगितले.