प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 9 जून : आयुष्यात शिक्षणाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. मात्र, अनेकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अनेक जणांवर कमी वयातच कुटुंब चालवण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे अनेकांना मधूनच शिक्षण सोडून द्यावे लागते. मात्र, वय वाढत असतानाही शिकण्याची ओढ काही जणांना स्वस्थ बसू देत नाही. या ओढीतूनच पुण्यातील एका 59 वर्षीय महिलेने आपली दहावी पूर्ण केली आहे. शिकण्याची इच्छा शीतल अमराळे यांना नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये 50 टक्के गुण मिळाले आहेत. सेवा सदन हायस्कूल पुणे या शाळेत शीतल या दहावीचे धडे गिरवत होत्या. बरेच वर्ष शिकण्याची इच्छा होती. परंतु वेळेअभावी आणि ज्वेलरी व्यवसाय सुरू असल्याने शिक्षण करता आले नाही. लहानपणी परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे शिक्षण घेतानाही आलं नाही. सेवा सदन शाळेतील शिक्षकांनी खूप सहकार्य केले. काहीही अडचण आली तरीही त्यात मदत केली, असे शीतल अमराळे यांनी सांगितले.
शीतल अमराळे या व्यवसाय सांभाळून शाळा सांभाळून रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. कामातून थोडा वेळ मिळाला की ऑफिसमध्येच पुस्तक वाचायचे. दहावीची परीक्षा देताना मनात थोडी भीती होती काय होईल काय नाही याचा ताण होता पण मनात जिद्द ठेवली आणि परीक्षा दिली असे शीतल यांनी सांगितले. दहावीची परीक्षा कशी काय देत आहे? परीक्षेच्या सेंटरवर गेल्यानंतर सर्व दहावीच्या छोट्या छोट्या मुली होत्या, त्या पाहून शीतल अमराळे यांच्याकडे पाहून हसत. काही मुलींना याचे नवल वाटायचे. तर काही मुलींना याचे आश्चर्य वाटायचे की 59 वर्षीय महिला दहावीची परीक्षा कशी काय देत आहे? पूर्वीचे शिक्षण आणि आत्ताचे शिक्षण यामध्ये बराच फरक शितल यांना जाणवला. शीतल या आपल्या नातवंडांचा अभ्यास देखील घेतात. त्यामुळे दहावी नववी याचा अभ्यासक्रम त्यांना बऱ्यापैकी माहीत झाला होता. नातवंडांनी थोडा शिकवले, असं शीतल सांगतात.
शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. एकेकाळी सुटलेले शिक्षण पूर्ण करून आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात देता येते. हे शीतल यांनी सिद्ध केले आहे. जवळपास चाळीस वर्षानंतर शीतल अमराळे दहावी पास झाल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.