पुणे, 05 जूनः कोविड-19 (COVID-19) विषाणूचं मूळ चिनी (China) लॅबमध्ये असल्याची चर्चा जगभर गेल्या वर्षभर सुरू आहे. (Pune) पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्युटमधील शास्रज्ञ डॉ. मोनाली सी. रहाळकर आणि बाएफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशनमधील शास्रज्ञ डॉ. राहुल बहुलीकर यांनी चिनी थिसिस, वैद्यकीय रिपोर्ट आणि इतर सायन्स जर्नलमधील प्रसिद्ध लेखांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हा विषाणू चिनी लॅबमधूनच आल्याचा शोध लावला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधनाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांच्या या शोधाबद्दल त्यांनी आपल्याच शब्दांत माहिती दिली. द वीक मॅगझिनने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जगभरात कोविड-19 विषाणूने (Sars Cov-2) आतापर्यंत 3.5 मिलियन बळी घेतले आहेत. पुन्हा जगाला अशा महामारीचा सामना करावा लागू नये म्हणून हा विषाणू आला कुठून हे शोधणं प्रचंड गरजेचं होतं. गेल्यावर्षी पहिल्यांदा हा विषाणू चीनमधल्या लॅबमधून जगभर पसरल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर गेल्या महिन्यापर्यंत याच चिनी कटाच्या थेअरीवर सगळ्यांचा विश्वास होता. अमेरिकी अध्यक्ष आणि अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोलचे माजी संचालक तसंच इतर प्रसिद्ध शास्रज्ञांनी याबद्दल सखोल तपास करून या विषाणूचं मूळ शोधून काढण्याची गरज व्यक्त केली होती. एक शास्रज्ञ जोडपं म्हणून आम्ही मार्च 2020 पासून याबद्दल शोध घेत होतो त्यातूनच आम्हाला या व्हायरसचा नियरेस्ट रिलेटिव्ह आणि तांब्याच्या खाणींचा (Copper Mine) संबंध असल्याचा धागा हाती लागला. सार्ससारखे चिमेरिक व्हायरस ( chimeric काल्पनिक किंवा अशक्य कोटीतील विषाणू) लॅबमध्ये तयार करणारे आणि कोरोना व्हायरसवर अनेक शतक अभ्यास करणारे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनातील प्राध्यापक राल्फ बॅरिक यांच्या संशोधनाचा आम्ही अभ्यास सुरू केला. बॅरिक यांचं काही संशोधन 2015 मध्ये नेचर मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यातील काही पेपर्समध्ये टेक्सास विद्यापीठातील विनीत मेनाचेरी यांनी सहलेखक म्हणून काम केलं होतं. या संशोधनातील इतर 13 सहलेखकांपैकी दोन जण वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीमधील (WIV) होते. त्यापैकी एक गे झिंग्यी आणि दुसरी चीनमधील सुप्रसिद्ध बॅट वूमन शी झेंगली ही होती. शी ने स्पाइक सिक्वेन्सेस आणि प्लास्मिड्स दिले होते असं त्या अभ्यासात म्हटलं होतं. शी वुहानमधील कोविड विषाणू संशोधनाचं नेतृत्व करते. तिची सायंटिफिक अमेरिका 2020 मध्ये आलेली मुलाखत आम्ही ऑनलाइन वाचली. त्याचबरोबर कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स इन्स्टिट्युटच्या ख्रिस्टिन अँडरसन यांनी चार सहलेखकांसोबत नेचर मेडिसीनमध्ये लिहिलेलं कोविड विषाणूच्या संभाव्य ओरिजनबद्दलचा लेख वाचला. त्यात असं म्हटलं होतं की, कोविडचा विषाणू पूर्णपणे नैसर्गिक असून तो लॅबमध्ये तयार करण शक्यच नाही. आम्हाला हे पटलं नाही, कारण कोविडचे विषाणू लॅबमध्ये तयार करता येतात हे आम्हाला माहित होतं. शीने 2020 मध्ये नेचरमध्ये प्रसिद्ध केलेल्या पेपरमध्ये Sars-CoV-2 असा या विषाणूचा उल्लेख पहिल्यांदा केला होता. पण तिच्या लॅबने वटवाघुळापासून कलेक्ट केलेला RaTG13 या Sars-CoV-2 शी 96.2 टक्के साधर्म्य असलेल्या विषाणूचा उल्लेख केला नव्हता. शीने 2013 मध्ये तिच्या ग्रुपने कलेक्ट केलेल्या युनानमधील सँपल व्यतिरिक्त काहीच माहिती दिली नव्हती. RaTG13 या विषाणूबद्दल माहिती मिळवण्यासाठी आम्ही दोन आठवडे अभ्यास केला. डीन बेनस्टन यांनी एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या पेपरवरून आम्हाला कळालं की, या विषाणूचं आधीचं नाव (Ra4991)आणि त्यामुळे आम्हाला Ra4991 याचा उल्लेख आम्हाला सापडला. शीच्या मुलाखतीतून आम्हाला कळालं की, Sars आणि Sars-CoV-2 हे विषाणू ज्या हॉर्सशू बॅटकडून माणसात येतात. त्या बॅटची वस्ती असलेल्या चीनमधील युनान प्रांतातील मोजियांग येथील बंद केलेल्या तांब्याच्या खाणीत डब्ल्युआयव्हीने एक्सपिडिशन केलं होतं आणि या बॅटच्या वैज्ञानिक नावावरून (Rhinolophus affinis) RaTG13 या विषाणूचं नामकरण केलं. या मुलाखतीत बॅटवूमन शीनी मोजियांग खाणीतल्या 6 कामगारांमध्ये न्युमोनियासारखी लक्षणं 2012 मध्ये दिसून आली होती असं म्हटलं होतं. मोजियांगबद्दलचा तिसरा संदर्भ आम्हाला सायन्स मॅगझिनच्या 2014 च्या अंकात सापडला. त्यात या तांब्याच्या खाणीतील 6 खाण कामगारांना न्युमोनियासदृश लक्षणं दिसली. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला असं म्हटलं होतं. आमचा अंदाज होता की याच तांब्याच्या खाणीतून डब्ल्युआयव्हीने RaTG13 विषाणूची सँपल गोळा केली असावीत आणि तो तिसऱ्या संदर्भामुळे तो अंदाज बरोबर ठरला. मोजियांगमधील मजूर मोजियांग खाण आणि तिथल्या मजुरांना झालेला न्युमोनिया याचा RaTG13 शी असलेला संबंध आम्हाला लक्षात आल्यावर आम्ही तो नेचरला कळवला आणि मॅटर्स अरायझिंग या त्यांच्या कॅटेगरीअतंर्गत त्याबद्दलची माहिती त्यांना दिली. आम्ही आमची प्रीप्रिंट प्रसिद्ध केली आणि आम्हाला ट्विटर यूजर @Theseeker268 याच्याकडून एक मेल आला. मोजियांगमधील खाणकामगारांची लक्षणं, त्यांच्यावर केलेले उपचार यासंबंधीची माहिती मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो असं त्याच्या मेलमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर त्याने चीनमधील मास्टर्स आणि पीएचडी थिसीसशी संबंधित cnki.net या वेबसाईटवरून चिनी भाषेतला मास्टर्सच्या थिसिसची लिंक ट्विट केली. अर्थातच हा अधिकृत सोर्स होता. आम्ही गुगल ट्रान्सलेट वापरून तो थिसिस भाषांतरित केला आणि नंतर bioscienceresource.org या संशोधन संस्थेने त्याचं प्रोफेशनल ट्रान्सलेशन ऑनलाईन उपलब्ध करून दिलं आहे. ‘‘या थिसिसमधून आम्हाला खाली दिलेली माहिती मिळाली’’ मोजियांगजवळच्या टाँगुआन या ठिकाणी असलेल्या बंद पडलेल्या तांब्याच्या खाणीतील वटवाघुळांनी केलेली घाण स्वच्छ करण्यासाठी चार जणांना एप्रिल 2012 मध्ये बोलवण्यात आलं होतं. 10 दिवस काम केल्यावर त्यांना खोकला, ताप आणि दम लागणं असा त्रास सुरू झाला आणि 14 दिवसांनी त्यांना काम करणंच अशक्य झालं. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल पण उपचारांनंतरही त्यांचा त्रास वाढतच गेला आणि काहींना व्हेंटिलेटर लावावा लागला. त्यानंतर आणखी दोन तरुण कामगारांना खाणीत कामाला पाठवण्यात आलं. त्यांना चार-पाच दिवसांतच असाच ताप, खोकला हा त्रास सुरू झाला आणि तेही त्याच हॉस्पिटलमध्ये अडमिट झाले. 10 दिवसांनी त्यांच्यातील सर्वांत वयस्कर 62 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचं कारण होतं कार्डिअक अरेस्ट. जून 2012 मध्ये दुसरा खाणकामगार मेला. त्यालाही न्युमोनिया श्वसनाची लक्षणं होती. दोन तरुण कामगार बरे झाले त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांना लक्षणांवरून सार्सची शंका आली त्यामुळे त्यांनी चीनमधील सार्सचे तज्ज्ञ डॉ. झाँग नानशान यांचं या आजाराबद्दल मत घेतलं. त्यांनी आजारी असलेल्या दोन खाण कामगारांची परिस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिली आणि सांगितलं की हा न्युमोनिया आहे आण दुसरं फंगल इन्फेक्शन असू शकतं. ट्रिटमेंट सुरू होती आयसीयूत 100 दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या कामगाराचा मृत्यु झाला. चार महिन्यांनी त्या चौथ्या कामगाराला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. ही माहिती त्या थिसिसमधून मिळाली. या थिसिसमध्ये त्या रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट त्यांच्यावरील उपचारांची इत्यंभूत माहिती होती आम्ही ती अभ्यासली. पुण्यातल्या एका रेडिऑलॉजिस्टनी त्या खाण कामगारांचे सीटी स्कॅन रिपोर्ट हे कोविड-19 पेशंटच्या सीटी स्कॅन रिपोर्टसारखेच असल्याचं आम्हाला सांगितलं. हेही वाचा- ‘या’ जिल्ह्यात सोमवारपासून अंत्यविधीसाठी कोणतीही बंधनं नाही, वाचा सविस्तर मग आम्ही एक पेपर लिहिला त्यात मोजियांगमधील खाण कामगारांच्या केसमधून सार्स सीओव्ही-2 संबंधी क्लू मिळू शकतो असं विधान आम्ही केलं होतं. याचाच अर्थ असा की डब्ल्युआयव्हीने या खाणकामगारांचे सँपल अभ्यासले होते. सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही चीनची बॅटवूमन शी हिला या खाण कामगारांचे मेडिकल रिपोर्ट, उपचार, त्यांच्या शरीरात सापडलेले सार्सचे अंश या संबंधांनी अनेक प्रश्न विचारले पण तिनी टोलवाटोलवीची उत्तरं दिली. कुठेही स्पष्टता नव्हती. फ्रँटियर्स इन पब्लिक हेल्थ या मासिकात 20 ऑक्टोबर 2020 ला आमचं संशोधन प्रसिद्ध झालं. त्यांनंतर आम्ही सायन्स आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनलाही आमचं संशोधन पाठवलं पण त्यांनी त्यात रस दाखवला नाही. आज आमचं संशोधन 50 हजार वेळा वाचलं गेलं असून काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये त्या संशोधनाचा उल्लेख झाला आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन्सनी न्यू-यॉर्कमधील इकोहेल्थ अलायन्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (WHO) लिहिलेल्या अनावृत्त पत्रातही आमच्या संशोधनाचा उल्लेख आला आहे. जगातील आघाडीचे कोरोना विषाणूतज्ज्ञ राल्फ बॅरिक यांनी एका इटालियन टीव्ही कार्यक्रमात म्हटलं होतं, ‘ तुम्ही कुठलेही पुरावे मागे न सोडता लॅबमध्ये विषाणू तयार करू शकता. तुम्हाला यासंबंधी ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती फक्त वुहानच्या लॅबरोटरीतील अर्काइव्ह्जमध्ये सापडू शकतील.’ त्यामुळे कोविड विषाणूचा उगम किंवा त्याचं मूळ चीनमधील वुहानमधल्या लॅबमध्ये आहे या चर्चेला बळ मिळतं. तसंच आमच्या अभ्यासातूनही दिसून येत आहे. पुण्यातील दोन शास्रज्ञांनी चीनमधील संशोधनातील पुरावे, थिसिस, मेडिकल रिपोर्ट यांचा सखोल अभ्यास करून हा विषाणू चीनमधील लॅबमधूनच आल्याचं सिद्ध केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधनाची दखल घेतली जात आहे आणि त्यातूनच लवकर हा विषाणू कुठून आला आणि त्यानी जगाला वेठीला धरलं याचं उत्तर मिळेल अशी आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.