पुणे जिल्ह्यात पोहोचलं तुफान! कार गेली वाहून पाहा VIDEO; सोलापूर महामार्ग ठप्प

पुणे जिल्ह्यात पोहोचलं तुफान! कार गेली वाहून पाहा VIDEO; सोलापूर महामार्ग ठप्प

पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बघता बघता अनेक चारचाकी वाहनं पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून जाताना पाहात राहावं लागतं. पाहा VIDEO

  • Share this:

पुणे, 14 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्राकडे निघालेलं तुफान आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आहे. संध्याकाळपासून जिल्ह्यातल्या अनेक भागांना धुवांधार पावसाने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची दैना उडवली. अनेक भागातली वीज गायब झाली आहे. सोलापूरलगच्या तालुक्यांना जबर फटका बसला. इंदापूर तालुक्यातल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड पाण्याचे लोंढे वाहात येत असल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भिगवण आणि इंदापूरच्या मध्ये महामार्गावर सुमारे दोन फूट पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा अवघड झाली आहे.

पुणे जिल्ह्यात तुफान आलं! विजांच्या कडकडाटासह आलेल्या धुवांधार पावसाने इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलं. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं अशा प्रकारे प्रवाहाबरोबर वाहून जाताना फक्त बघत राहावं लागलं. इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी भागात एक गाडी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहात जातानाचा VIDEO व्हायरल होत आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्यात अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं तर या पावसाने अतोनात नुकसान केलं आहे.

पुढचे 3 दिवस धोका कायम

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलंं हे तुफान हळूहळू पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे. पुढचे तीन दिवस यामुळे राज्यभर विशेषतः पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 14, 2020, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading