पुणे 29 मे: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजुन निर्णय झालेला नाही. पादुका पंढरपूरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल १० लाख भाविक पाय चालत पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जिवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमधून महिनाभर आधी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातून विविध संतांच्या शेकडो दींड्याही त्यात येवून मिसळतात. तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त वैष्णवांचामेळा हा आपल्या लाडक्या दैवताला भेटण्यासाठी जात असतो.
या वारी परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वादळ, वारा, उन, पाऊस अशा कशाचीही तमा न बाळगता वारकरी कुठल्याही संकटाची पर्वा न करता अतिशय आनंदात या सोहळ्यात सहभागी होत असतात. काळाबरोबर चालणारा आणि अतिशय विचारी आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा असलेल्या वारकरी समाजाने सध्याचं कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सरकारला साथ देत हा मोठा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.