प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 9 जून : सध्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पारंपारिक चौकटीत न अडकता स्वत:ची ओळख निर्माण करतीय. आजवर ‘पुरुषी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिलांनी फक्त प्रवेश केलेला नाही तर खणखणीतपणे स्वत:ला सिद्ध केलंय. पुण्यातल्या दीपा परब यांनीही एका नव्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवलाय. दीपा यांनी पुण्यात ‘लेडी बाऊन्सर अँड वूमन पॉवर ग्रुप सुरू केलाय. महाराष्ट्रातला हा पहिला लेडी बाऊन्सर ग्रुप आहे. 2016 पासून हा ग्रुप काम करतोय. हा ग्रुप सुरू करण्यापूर्वी दीपा मुंबईत काम करत होत्या. पुण्यात आल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात करिअर सुरू केलं.
कशी झाली सुरूवात? ‘मला काही तरी वेगळं करायचं होतं. सेलिब्रेटींच्या जवळ काळ्या कपड्यातील दोन पुरुष दिसले. ते तिथं काय करतात हा प्रश्न मला पडला. मी त्यांच्याक़डून काम शिकले आणि बाऊन्सर म्हणून काम सुरू केलं. मला सुरूवातीला टॉयलेट आणि बाथरूम जवळ उभं करण्यात आलं. त्यावेळी मला इथं का उभं केलं? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावेळी महिला या प्रकारची कामं करण्यात सक्षम नाहीत, असं उत्तर मला मिळालं. मी हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला. 100 पेक्षा जास्त श्वानंसह एकाच घरात राहते 22 वर्षांची तरूणी, कसा करते सांभाळ? पाहा Video पोलीस भरतीचे जे निकष असतात, त्यामध्ये मी बसत होते. मी माझ्यासारख्या महिलांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांची फिटनेस टेस्ट घेतली, तसंच काम करण्याची जिद्द तापसली. माझ्या ग्रुपमध्ये 2 वर्षांपूर्वी फक्त 12 महिला होत्या. आज 500 हून अधिक महिला बाऊन्सर म्हणून काम करत आहेत. मोठे कार्यक्रम, मेळावे, राजकीय सभा या सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी या बाऊन्सर काम करतात,’ अशी माहिती दीपा यांनी दिली. नवऱ्याची मारझोड सहन करणाऱ्या, त्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांना दीपा यांनी आधार दिला आहे. त्यांना लेडी बाऊन्सरचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवलंय.