प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 26 जून : जगातील प्रमुख वाहतूक व्यवस्थेत भारतीय रेल्वेचा समावेश होतो. भारतासारख्या खंडप्राय देशाला जोडणारं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास, काळानुसार त्यामध्ये झालेले बदल याचे सर्वांना आकर्षण असते. पुणे शहरात रेल्वेचं खास म्युझियम उभारण्यात आलंय. या म्युझियमला भेट देऊन रेल्वेचं विश्व समजून घेण्याची संधी पुणेकरांना आहे. कुठे आहे रेल्वे म्युझियम? पुण्यातील कोथरूड भागात हे रेल्वे म्युझियम आहे. बीएस जोशी (भाऊ जोशी) यांनी या म्युझियमची स्थापना केली. 1 एप्रिल 1998 पासून हे सर्वांना खुले करण्यात आले. या म्युझियममध्ये जगभरातील ट्रेन आणि रेल्वे स्टेशनच्या लहान स्वरुपातल्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. लहान लोकोमोटिव्ह आणि कॅरेजेसपासून ते लहान प्रवासी आणि स्थानकांवर गजबजणारे कर्मचारी यांच्या बारीकसारीक गोष्टी याठिकाणी पाहायला मिळतात. 2004 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या म्युझियमची नोंद झालीय.
‘चाळीस वर्षे माझे बाबा आणि आजोबा रेल्वेच्या सर्व वस्तू जमा करत होते. तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स पाहायला मिळतात. यामध्ये केबल कार, डेक्कन ट्रेन, फुलराणी आणि वंदे ‘भारत’ चा समावेश आहे, अशी माहिती भाऊ जोशी यांचा नातू देवव्रत जोशी यांनी दिली. या म्युझियमची माहिती देण्यासाठी 25 मिनिटांचा खास शो आहे. त्यामध्ये लहान-लहान रेल्वे धावताना पाहता येतात. एक लहान स्टेशनच इथं तयार करण्यात आलंय. यामध्ये 6 प्लॅटफॉर्म आहेत. 3 मुख्य लाईन, क्रेन, एक घोषणा प्रणाली, चांगली लोडिंग सुविधा, हंप शंटिंग इ. येथे 65 सिग्नल, 10 प्रकारच्या गाड्या, 26 पॉइंट, कुंपण आणि उड्डाणपूल आहेत. हे सर्व पूर्णपणे हाताने बनवलेले आहेत, अशी माहिती देवव्रत यांनी दिली. Pune News: छंद माझा वेगळा, जोशी काकांनी जमवल्या तब्बल 250 हून अधिक गाड्या जोशी यांचं रेल्वे संग्रहालय सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सर्वांना खुल असतं. शनिवारी सकाळी 9 ते 4 आणि संध्याकाळी 5 ते 8 तर रविवारी संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत हे म्युझियम सर्वांसाठी खुलं आहे जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेचे तिकीट. 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी 120 रुपये आहे. तर 3 वर्षांखालील मुलांसाठी विनामुल्य प्रवेश आहे, असं देवव्रत यांनी स्पष्ट केलं.