वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं आहे. अचानक रिक्षावर हे झाड पडल्यानं रिक्षाचालकही रिक्षात अडकून पडला होता.
दरम्यान परिसरातील लोकांनी तातडीनं या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाचा जीव वाचवला आहे.
एवढं मोठं झाड रिक्षावर कोसळूनही वयोवृद्ध रिक्षाचालक बचावल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचं बरंच नुकसान झालं असून रिक्षाचालकाला मुका मार लागला आहे.
अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेत आपलं कर्तव्य पार पाडल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांचं देखील कौतुक केलं जात आहे.