पुणे, 23 मे: पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित आढळले. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 5167 झाला आहे.
एकट्या पुणे शहरात तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2212 इतकी आहे.
हेही वाचा...धक्कादायक! अर्धवट जळालेल्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशात सध्या 1 लाख 19 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 49 हजार 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 66 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 44 हजार 582 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंतची एक दिवसांतली सर्वाधिक रुग्णांची वाढ शुक्रवारच्या आकड्यांमधून समोर आली. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2940 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. त्यातली सर्वाधिक वाढ अर्थातच मुंबईत दिसून आली. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या 24 तासांत 63 मृत्यू नोंदले गेल्याने कोरोनाबळींची संख्या 1517 वर पोहोचली आहे.राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 44582 वर पोहोचली आहे. दिवसभरातल्या 63 कोरोना मृत्यूंपैकी मुंबईत 27 आणि पुण्यात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा.. जीवाची बाजी लावून आयुष डॉक्टर करतायेत देशसेवा; मात्र दिली जातेय अशी वागणूक
मुंबईत रुग्णवाढीचे दररोज नवे उच्चांक समोर येत आहेत. आज एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत पुन्हा दिसून आली. 1751 रुग्ण गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले. शहरात कोरोनाव्हायरसमुळे 27 मृत्यू नोंदले गेले. मुंबईत कोरोनाव्हायरसचा धोका उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ठाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात आज 186 नवे रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीतली ही मोठी वाढ आहे.