पुणे, 31 सप्टेंबर : दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असताना आता पुण्यातून आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात धायरी हा एक नवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. एकट्या धायरी गावात आजमितीला तब्बल 550 अक्टिव्ह रुग्ण आहेत तर एकूण रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास पोहोचली आहे.
धायरीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं लक्षात येताच पालिकेकडून महत्त्वाचे रस्ते पत्रे घालून बंद करण्यात आले. पण नागरिकांनी तिथूनही बाहेर जाण्यासाठी जागा शोधल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशाने कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे परिसरात असलेलं लायगुडे हॉस्पिटलचं स्वॅब सेंटरही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मुख्यमंत्री 1 वाजता जनतेशी थेट साधणार संवाद, ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष
पुणे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर अर्थात बाधित दर 28 टक्के झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येने उचल खाल्ली आहे. पॉझिटिव्ह दर हा 5 टक्केच्या खाली असणं अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आकडा वाढतो आहे. हा आकडा कमी न झाल्यास 4-8 दिवसांत पुण्यात स्थिती बिघडू शकते अशी भीती महापालिककेने व्यक्त केली आहे. अत्यवस्थ रुग्ण संख्या कमी होत नसल्याने icu ,ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे. अशात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता तर आधी पासूनच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार ठिणगी, नव्या बदलांमुळे नेत्यांमध्ये संताप
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रोज साडेसहा हजार नागरिकांच्या चाचण्या होत आहेत. पालिका आयुत विक्रम कुमार यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पण असं असलं तरी रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना हाताबाहेर जातो की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याने कोरोना रूग्णसंख्येचा 2 लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकर आता कोरोनाच्या साथीत देशात नंबर 1 झाले आहेत. अर्थात ही काही भुषणावह बाब नाही. अगदी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे पुणेकर नेमके चुकले कुठे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Pune, Pune news