वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 15 जून : असंवेदनशील प्रशासकीय कारभाराचा मोठा फटका कॅन्टोन्मेंटमधील एका कुटुंबाला बसला आहे. कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मृतदेह न्यायचा तर शववाहिनीसाठी चालक उपलब्ध नाही. हेही कमी म्हणून की काय कॅन्टोन्मेंट हॅास्पिटलचं शवागारही बंद पडल्याने कँपातल्या मोदीखान्यात राहणाऱ्या चाबुकस्वार कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काय आहे प्रकरण? पुण्यासारख्या शहरात कँप परिसरात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नेणाऱ्या गाडीला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन विभागात गाडीला चालक उपलब्ध नाही. नवा मोदीखाना कँप येथून केवळ 500 मीटर अंतरावरील पटेल रुग्णालयात घरी मृत्यू झालेल्या 95 वर्षीय वृद्धेला शवागारात ठेवण्यासाठी रात्री 10 वाजता प्रमोद चाबुकस्वार निघाले होते. नातेवाइकांनी बोर्डाचे धोबी घाट येथील वाहन तळ गाठले. मात्र, त्या ठिकाणी शववाहिनी चालविण्यासाठी चालकच नव्हता. अखेर मृतदेह रिक्षातून रूग्णालयातल्या शवागारात ठेवण्यासाठी आणला. तर शवागारही बंद पडलेलं होतं. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला या सगळ्या हलगर्जीपणाबाबत विचारणा केली असता कर्तव्यावरील नर्सने माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टर म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधीक्षकांचा बंगलादेखील बंद होता. त्यानंतर अखेर ससून रुग्णालयातील शवागारात मृतदेह हलविण्यात आला. याप्रकरणात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी शवागार बंद असण्याचं तांत्रिक कारण पुढे करत मशीनच्या खरेदीची आणि दुरूस्तीची कागदपत्रे सापडत नसल्याने तात्पुरती देखभाल करूनही मशीन चालत नाही, अशी उलट तक्रार केली आहे. तर वाहन विभागाचे हेमंत यांनीही अनावधानाने झालेली चूक असून झाल्याप्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. वाचा - पुणे : पती वेळ देत नव्हता, पत्नीने जे केलं ते हादरवणारंच, सर्वच जण चक्रावले शववाहिनी, शवागारासारख्या आवश्यक सुविधा कॅन्टोन्मेंट बोर्ड देऊ शकत नसेल, तर कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीन करा, अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. इतक्या अतितातडीच्या सुविधांच्या बाबतीतही कॅन्टोन्मेंटचा प्रशासकीय कारभार इतक्या गलथानपणे चालवला जात असेल तर एरवी इथे काय चालत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.