वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 15 जून : पती पत्नीमधली वादावादी ही तशी सामान्य गोष्ट आहे. सगळ्याच घरात कुरबुरी होतात पण पती वेळ देत नाही म्हणून थेट पती काम करत असलेल्या कंपनीला त्याच्याच मेल आयडीवरून मेल करून बॅाम्बने उडवून देण्याची धमकी एका महिलेने दिली आहे. त्याला अद्दल घडवण्यासाठी महिलेने हा प्रकार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणार असं जुने जाणते म्हणायचे. नवरा बायकोमधील वाद म्हणजे पेल्यातलं वादळ. ते लगेच शमलं पाहिजे. पण चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ट्युशन टीचरने पतीला अद्दल घडवण्यासाठी केलेल्या उद्योगाने सगळी यंत्रणाच कामाला लागली आहे. नर्गिस (नाव बदललेले) ही दुसरे लग्न केलेला पती वेळ देत नाही म्हणून झालेल्या वादावादीतून चिडली आणि चिडल्यावर तिने पती काम करत असलेल्या कंपनीला पतीच्या मेल आयडी वरून धमकीचा मेल केलाय. त्यामुळे कंपनीतल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि यामुळे पोलिसांची यंत्रणा कामाला लागली.
तर यानंतर रौनक (नाव बदललेले) याला चंदननगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण समोर वेगळंच आलं. वेळ देत नसल्याच्या कारणाने चिडून जाऊन नर्गिस हिने मुलाच्या टॅबमध्ये असलेल्या पतीच्या मेल आयडी वरून कंपनीला मेल लिहिला. एमए इंग्लिश असलेल्या नर्गिसने एखाद्या दहशतवादी संघटनेने पाठवावा असा धडकी भरवणारा मेल कंपनीला पाठवला. वेळ न देणाऱ्या नवऱ्याला चांगली अद्दल घडावी, त्याची नोकरी जावी. पोलिसाकडे त्याची चौकशी व्हावी. त्याला त्रास व्हावा, हा एकच उद्देश्य त्यामागे होता. तर पती पत्नीच्या घरगुती वादाचे पर्यवसन कुटुंबाला होणाऱ्या त्रासात होणे साहजिक असते. मात्र, इथे थेट पती कामाला असलेल्या कंपनीपासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांनाच अद्दल घडवणाऱ्या नर्गिसला आता गजाआड व्हावं लागलं आहे. पतीसाठी लावलेल्या सापळ्यात आता तीच अडकली आहे. याप्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.