पुणे, 23 ऑक्टोबर : प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता झाल्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकााळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाई नोट सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचा-आधी धडक दिली नंतर कारने चिरडून पळाला, अखेर महिन्याभरानंतर पुणे पोलिसांनी पकडला
पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असाव या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रूपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.