पिंपरी चिंचवड, 1 मार्च : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. तुरुंगाबाहेर पडल्यानंतर काढलेली जंगी मिरवणूक असो किंवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून मिळवलेला जामीन, या घटनांमुळे गजानन मारणे हा पोलीस प्रशासनासाठी एक आव्हान ठरत आहे. मात्र याच गज्या मारणे याच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. गजानन मारणे याच्यासह टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रॅली काढताना उर्से टोल नाक्याजवळील फूड मॉलवर थांबून पैसे न देता पाणी, वडापाव घेऊन पैस देण्यात आले नाहीत आणि दहशत माजविल्याप्रकरणी मारणेसह टोळीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर गज्या मारणे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी रॅली काढताना उर्से टोल नाक्यावर टोलचे पैसे न दिल्याने गज्या मारणे आणि त्याच्या टोळीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा - कैद्यांनो, कोरोनाची सुट्टी संपली आता परतायचं; सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश गज्या मारणेविरोधात चार्जशीट दाखल होताच मोक्का दाखल करणार अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. गजानन मारणेचं पोलिसांना आव्हान एका गुन्ह्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गजानन मारणेला फरार घोषित केलं. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून गजा मारणे मावळ कोर्टात हजर झाला आणि त्याला न्यायालयालाकडून जामीनही मंजूर झाला होता. पोलिसांना न सापडणारा गजा मारणे जामीन घेऊन न्यायालयातून राजरोस बाहेर पडल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळीवर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.