पुणे, 05 फेब्रुवारी : नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA Goverment) नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. पण, 'हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, आमच्या कुणाचाही नाराजी नाही', असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी स्पष्ट केले.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात दोन उपमुख्यमंत्री पद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल नाही, असं पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट केले.
'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं, असं म्हणत अजित पवार यांनी निलेश राणे यांचं नाव न घेता सणसणीत टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कर कमी केले तर पेट्रोलच्या दरात कपात करता येईल, असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार म्हणाले की, त्यांना सांगा आधी केंद्रातले कर कमी करा मग राज्य सरकार विचार करेल' असा टोलाही पवारांनी लगावला.
मुंबईत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी एकच प्राधिकरणाबद्दल भूमिका मांडली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहे का असं पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार म्हणाले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जसं सांगतील तसं होईल. मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल त्याविरोधात बोलू शकत नाहीत त्यांना तिथेच राहायचे ना?'
'मी कधी पण आक्रमक होत नसतो योग्य वेळी व्हायचं तेव्हा होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले गनिमी कावा, तोच सुरू आहे', असंही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.