उदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा

उदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

पुणे,27 सप्टेंबर:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य केल्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी तीन नावांचा विचार सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या तीन नेत्यांच्या नावाचा विचार सुरू असून लवकरच यातून एक नाव जाहीर करणार असल्याचा खुलासी शरद पवार यांनी केला आहे. आता याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र, राज्यात जास्त चर्चा आहे ती सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची. कारण सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक सोबतच होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सत्तारुढ भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. आता साताऱ्यातील रिक्त जागेसाठी मतदान होईल. भाजपत गेलेल्या उदयनराजे भोसले यांना आता खासदार होण्यासाठी निवडून यावेच लागणार आहे. भाजपकडून निवडणूक लढवताना त्यांना कोणाचा सामना करावा लागेल, हे अद्याप ठरलेले नाही. परंतु साताऱ्यात उदयनराजेंना शह देण्यासाठी तीन नावांचा विचार सुरू असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार स्वतः उतरू शकतात रिंगणात..

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, शरद पवार स्वतः साताऱ्याच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीला उभे राहू शकतात. शरद पवारांनीच ही पोटनिवडणूक लढवावी, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत. कदाचित स्वतः पवार उदयनराजेंना शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील, अशीही जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादीने कसली कंबर...

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नाव चर्चेत येत आहेत. उदयनराजेंची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. नंतर श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांच्याही नावाची चर्चेतून पुढे आली आहे. सारंग पाटील पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत तयार होताना दिसत असतानाच आता पवारांनीच निवडणूक लढवावी. यासाठी कार्यकर्ते आग्रह करत आहेत. परंतु पक्षाकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

उदयनराजे यांना अश्रू अनावर..

शरद पवार यांनी नुकताच सातारा दौरा केला होता. यावेळी पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले होते. तसेच यावेळी उदयनराजे यांना अश्रूही अनावर झाले होते. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणार नाही. मला शरद पवार यांच्याबद्दल आदर आजही आहे,' असे भावुक उद्गारही उदयनराजेंनी काढले होते.

VIDEO:अजितदादांनी का दिला राजीनामा? शरद पवारांचं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 09:52 PM IST

ताज्या बातम्या