कोथरुडमध्ये तिकीट नाकारलेल्या मेधा कुलकर्णींची अखेर दखल, भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर दिलं स्थान

देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची थेट राष्ट्रीय स्तरावर शिफारस केल्याचं सांगितलं जातं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची थेट राष्ट्रीय स्तरावर शिफारस केल्याचं सांगितलं जातं आहे.

  • Share this:
पुणे, 21 जून : पुण्यातील भाजपच्या (Pune BJP) माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकारिणीत स्थान मिळालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिती श्रीनिवासन यांनी आज आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी यांच्या एकमेव नावाची शिफारस केली होती. (Medha Kulkarni finally given a place at the BJP's national level) गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड या भाजपच्या बालेकिल्ल्यातून लोकप्रिय आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकिट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने मोठं वादंग निर्माण झालं होतं. त्यांनीही जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या याच नाराजीचा पुरेपूर राजकीय फायदा उचलण्यासाठी समोरच्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारीची खुली ऑफर दिली होती. त्यावर प्रदेश भाजपकडून त्यांना विधान परिषदेचं आश्वासनही दिलं गेलं पण पुढे त्याचं काहीच झालं नाही उलट त्यांना अडगळीत टाकलं गेलं. पण मध्यंतरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. किंबहुना तेव्हाच हे स्पष्ट झालं की पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि आज अखेर मेधा कुलकर्णी यांचे थेट राष्ट्रीय स्तरावर राजकीय पुनर्वसन झालंय असं म्हटलं जात आहे. हे ही वाचा-शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार का? भाजप खासदाराचे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची थेट राष्ट्रीय स्तरावर शिफारस केल्याचं सांगितलं जातं आहे. प्रदेश भाजपमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन तुल्यबळ नेते आहेत. पण मेधा कुलकर्णी कोथरूडची हक्काची जागा सोडण्यावरून त्यावेळी काहिशी नापसंती व्यक्त केल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर खप्पा मर्जी झाल्याचं बोललं जात होतं. नव्हे कोथरूडमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही अनेकदा बोलावलं जात नव्हतं. पण तरीही मेधा कुलकर्णी यांनी पक्ष सोडला नाही, याच पक्षनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना आज थेट राष्ट्रीय स्तरावरची नेमणूक दिली गेल्याचं सांगितलं जात आहे. या निवडीबद्दल मेधा कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्षाने माझ्या कामाची अखेर दखल घेतल्याचं आत्यंतिक समाधान आहे. आता मी पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचं त्या न्यूज18 लोकमतशी बोलताना म्हणाल्या.  
Published by:Meenal Gangurde
First published: