इंदापूर, 17 मार्च : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) हे सध्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अशातच महादेव जानकर हे इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) माळवाडी येथे आले असता त्यांनी उजनीत नौका विहाराचा आनंद घेतला. यावेळी जानकर यांनी महाविकास आघाडी आणि सत्तांतर याबाबत केलेली एक गंमतीशीर प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे.
उजनीत नौका विहाराचा आनंद लुटताना जानकर हे दुर्बिणीतून उजनीचा परिसर न्ह्याळत होते. त्याचवेळी एका कार्यकर्त्याने साहेब काय दिसत आहे? असं विचारले असता मी दुर्बिणीतून सरकार कधी पडतंय ते बघतोय अशी मिश्किल टीपण्णी जानकर यांनी केली आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
रासप कार्यकर्त्यांना जानकरांचा नवा आदेश
'ओबीसीची जनगणना व्हावी ही ना काँग्रेसची इच्छा ना भाजपाची इच्छा आहे. त्यासाठी आता ओबीसींनीच जागं झालं पाहिजे. ओबीसींनी प्रस्थापित पक्षाचे चमचा बनले नाही पाहिजे. तीस-चाळीस वर्ष काँग्रेसने राज्य केले आता हे करत आहेत. मी ज्या वेळेस पशुसंवर्धन मंत्री होतो त्या वेळी सर्व प्राण्यांची कुत्री,मांजर,गाढव,शेळ्या,बैल,गाय,मेंढरंयांची गणना केली. मग या भाजपने ओबीसीची जनगणना का केली नाही,' असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं आहे. तसंच राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या जिल्ह्यात ओबीसी जनगणनेचा आग्रह धरावा, अशा सूचना जानकर यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : शरद पवारांच्या भेटीनंतर राऊतांनी दिली तिरकस प्रतिक्रिया
'या आघाडी सरकारमध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही. शिवसेनेला वाटतं हे आमचं सरकार नाही. काँग्रेला वाटतं आम्हाला विश्वासात घेत नाहीत. तर राष्ट्रवादी या सरकारची मालक होऊन बसली आहे . वीज बिलावरुन जनताच या सरकारचा कडेलोट करेल,' असं म्हणत महादेव जानकर यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news