मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे जिल्ह्यात अत्याधुनिक पद्धतीने होणार बिबट्यांची गणना, कसं आहे नवं तंत्र? जाणून घ्या

पुणे जिल्ह्यात अत्याधुनिक पद्धतीने होणार बिबट्यांची गणना, कसं आहे नवं तंत्र? जाणून घ्या

मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जुन्नर, 8 फेब्रुवारी : बिबट्या मानव संघर्षाबरोबरच मानव बिबट्या सहजीवनाचं एक आगळंवेगळं डेस्टीनेशन ठरलेल्या जुन्नर वनविभागातल्या बिबट्यांची गणना आता अत्याधुनिक शास्त्रोक्त प्रणालीचा अवलंब करून करण्यास सुरुवात झाली आहे. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(डब्ल्यू.आय.आय)कडून ही गणना करण्यात येत आहे. या गणनेसाठी 100 ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. तसंच सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब केला जाणार असून बिबट्यांच्या वर्तनशैलीचे अनेक पैलू देखील या गणनेबरोबर, या उपक्रमातून पुढे येणार आहेत.

या प्रकल्पासाठी शासनाच्या कॅम्पा योजनेतून 3 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी ही माहिती दिली. जुन्नर वनविभागाच्या अंतर्गत जुन्नर,शिरुर,खेड आणि आंबेगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे. तर या चारही तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठा वाढला आहे. त्यामुळे जुन्नर वनविभागात बिबट्यांची एकूण किती संख्या आहे, या माहितीबरोबरच बिबट्यांच्या अधिवासातील आवडीची ठिकाणे, त्यांच्या वर्तनशैलीचे पैलू यांचीही माहिती याप्रकल्पाच्या माध्यमातून होत असलेल्या शास्त्रीय अभ्यासातून पुढे येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - आधुनिक काळातला श्रावणबाळ, पुण्यातल्या आजीबाईंची कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी

डेहराडूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(डब्ल्यू.आय.आय) या संस्थेचे प्रमुख संशोधन शास्त्रज्ञ डॉ.हबीब बिलाल यांच्या नेतृत्वाखाली दोन प्रकल्प सहाय्यक यासाठी काम करत आहेत. ही गणना आता आंबेगाव तालुक्यातून सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व तालुक्यांतील गणना आणि संशोधन प्रकल्पाचे टप्पे पूर्ण करत एकूण माहितीसह बिबट्यांच्या गणनेचा तपशील चार वर्षांत संकलित होणार आहे.

एकावेळी 50 चौ.किमी अंतरात 100 ट्रॅप कॅमेरे लावून महिनाभरातील निरीक्षणे नोंदींचे संकलन सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे केले जाते. ट्रॅप कॅमेऱ्यातून वेळोवेळी टीपल्या जाणाऱ्या बिबट्यांच्या हालचाली, तसंच बिबट्यांच्या शरीरावरील ठिपके आणि त्यांचा रचनांकित प्रकार याचीही नोंद कॅमेऱ्याच्या माध्यमातून सॉफ्टवेअरमध्ये होत असल्याने कोणता बिबट्या कोणत्या परिसरात वास्तव्य करतो, त्याची एकूण किती परिघात भटकंती असते, बिबटे डोंगरावर राहणे पसंत करतात की पठार पातळीवरील शेतात याबाबतचे पैलू देखील या प्रकल्पांतर्गत नोंदल्या जाणाऱ्या निरीक्षणातून पुढे येणार आहेत.

जुन्नर वनविभागाच्या परिक्षेत्राबाहेरून काही बिबटे या भागात येतात का? याचीही माहिती या प्रकल्पातून पुढे येणार असून बिबट्या व्यवस्थापनासाठी या शास्त्रीय अभ्यासातून येणारे निष्कर्ष डब्ल्यू.आय.आय कडून शासनाला देण्यात येणार आहेत. त्यातून बिबट्या-मानव संघर्ष दूर करण्यासाठी करायवयाच्या उपाययोजनांबाबत धोरणे ठरविताना या अभ्यासात्मक निष्कर्षांची मोठी उपयुक्तता असणार आहे.

बिबट्यांना रेडिओ कॉलर लावणार

बिबट्यांच्या भटकंतीचा मार्ग आणि वर्तन शैलीचे तपशील हाती यावेत यासाठी 15 बिबट्यांना रेडिओ कॉलर चिप बसविण्यात येत आहेत. त्यामुळे एकंदरीत बिबट्याचा भौगोलिक क्षेत्रात फिरण्याचा माग शोधणे देखील या माध्यमातून शक्य होणार आहे. त्यासाठी 15 बिबट्यांना रेडिओ कॉलर लावण्यासाठीची परवानगी मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर यांच्याकडून मिळाली आहे.

First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune news