पुणे, 18 मे : कोरोना पेशंट्साठीचा रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोच आता म्युकरमायकोसीस या आजारावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शनचा बाजारात प्रचंड तुटवडा जाणवत आहे. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या पुण्यासह राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे.
त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईंकांची या महागड्या इंजेक्शनसाठी फरफट सुरू झाली. एका पेशंट्साठी दिवसाला किमान पाच ते सात याचे डोस द्यावे लागतात. पण अचानक मागणी वाढल्याने सध्या कुठेच हे इंजेक्शन उपलब्ध नाहीय. एकट्या पुणे शहरात म्युकर मायकोसीसचे 220 च्या वर पेशंट्स उपचार घेत असून एम्फोटेसीरीन बी या इंजेक्शनची डिमांड 2 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. पण उपलब्ध होताहेत फक्त पाचशे इंजेक्शन्स. त्यामुळे इंजेक्शनअभावी रूग्णांची जीवाला धोका आहे. सिपला, मायलॉन आणि भारत सिरम या तीन कंपन्या अंदाजे सहा ते सात हजाराला हे इंजेक्शन विकतात. पण सध्या बाजारात हे इंजेक्शन कुठेच उपलब्ध नाहीये. याबाबत पुणे केमिष्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बेलकर म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी पुण्यात या या इंजेक्शनची डिमांड अवघी पाचशे इतकी होती. पण जसे म्युकर मायकोसिसीसचे पेशंट्स वाढू लागले तशी मागणीत तिप्पट वाढ होऊन आता दिवसाकाठी 2 इंजेक्शन लागत आहेत.
एका पेशंट्सला दिवसाकाठी पाच ते सात डोस दिले जात असून या कोर्सचा कालावधी किमान दहा दिवसांचा असल्याने एका पेशंट्ला 80 ते 120 इंजेक्शन लागत आहेत. पण या इंजेक्शनची बँच तयार होण्यासाठीच किमान 15 ते 21 दिवसांचा कालावधी लागत असल्याने संबंधित केमिकल कंपन्यांकडूनच त्याचा अतिरिक्त स्टॉक उपलब्ध होत नाही. परिणामी रूग्णांच्या नातेवाईंकांनाही आम्ही केमिस्ट वेळेत ही इंजेक्शन्स पुरवू शकत नाहीत, या मागणी आणि पुरवठ्यामधील तफावतीबाबत आता सरकारनेच काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
हे ही वाचा-पुण्यात गुंडाच्या अंत्ययात्रेत 150 बाईकची रॅली; VIDEO आल्यानंतर पोलिसांना जाग
या एका इंजेक्शन कोर्सचा एका पेशंट्ससाठीचा खर्चच किमान सात लाखांपर्यंत जातोय, तर इतर खर्च धरून म्युकरमायकोसीसचा एका क्रिटिकल पेशंट्सचे बिल वीस ते पंचवीस लाखांच्या घरात जात असल्याचं सांगितलं जातं. बरं एवढं करूनही काही रूग्णांना त्यांचा डोळा, जबडा असे गमवावे लागत आहेत. यावरून हा म्युकरमायकोसीसचा संसर्ग किती महाभयंकर बनलाय, हे सहज स्पष्ट होतंय. कोरोनाच्या उपचारादरम्यान ऑक्सीजन वरील काही पेशंट्सना स्टेराईड्सचा ओव्हरडोस दिला गेल्यानेही म्युकरमायकोसीसचा संसर्ग झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. म्हणूनच कोरोना रूग्णांसोबतच संबंधित डॉक्टरांनीही याचा संसर्गच होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला टास्क फोर्सकडून दिला गेलाय. दरम्यान, रेमडीसीवीरच्या धर्तीवरच आता म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचं वितरणही आपल्या हाती घेण्याचा विचार एफडीए आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे लवकरच तशी ऑर्डरही निघू शकते पण या इंजेक्शनचं प्रॉडक्शन वाढावं, यासाठीही सरकारला संबंधित कंपन्यांशी बोलणी करावी लागतील तरंच हा तुटवडा कमी होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.