चिंचवड, 6 फेब्रुवारी : कसबा पेठ आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांना आवाहन करण्यात येत आहे, पण महाविकासआघाडी दोन्ही पोटनिवडणुका लढण्यावर ठाम आहे. काँग्रेसने सोमवारी कसबा पेठ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चिंचवडमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींनंतरही उमेदवार निश्चित झालेला नाही.
मंगळवारी अर्ज दाखल करत असतानाच उमेदवाराची घोषणा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला संपर्क केला, तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असली तरी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. चिंचवडची पोटनिवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवली जाईल, डांगे चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादीचा उमेदवार अर्ज दाखल करेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या या विधानामुळे चिंचवडची पोटनिवडणूकही बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. असं असलं तरी उमेदवार घोषित केला नसल्यामुळे महाविकासआघाडीमधले इच्छुक मात्र गॅसवर आहेत. ही निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपचं आवाहन
भाजपने चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. उद्या 3 वाजेपर्यंत महाविकासआघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या रासने यांचं तिकीट मागे घेऊ. निवडणूक लादू नये, एका वर्षासाठी लोकांना निवडणुकीला पाठवू नये. आमची कागदपत्र तयार आहे, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयारत आहोत, पण महाविकासआघाडीकडून तसं येऊ दे, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP