पुणे, 5 जानेवारी : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी महोत्सवासाठी 72 देशांमधून 1574 इतके चित्रपट आले असून त्यापैकी 140 चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे. का लांबला महोत्सव ? यावर्षी जानेवारी महिन्यात नियोजित असलेला महोत्सव आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरविले आहे. आधीच्या तारखांदरम्यान नेमकी जी 20 परिषद संबंधी बैठका या पुण्यात होणार होत्या. या दरम्यान सेनापती बापट रस्त्यांवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये महोत्सवाच्या 6 स्क्रीन्स होत्या. या ठिकाणी प्रशासनावरील ताण आणखी वाढू नये म्हणून आम्ही प्रशासनाच्या विनंतीचा स्वीकार करीत तारखा पुढे ढकलल्या असं जब्बार पटेल यांनी सांगितले.
या पद्धतीनं करता येणार नोंदणी? दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी महोत्सव हा केवळ चित्रपटगृहात अर्थात ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यावर्षीच्या महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार आहे. तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया ही गुरुवार दिनांक 19 जानेवारी पासून सुरू होणार आहे. कुठे पार पडणार? सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) या तीन ठिकाणी एकूण 9 पडद्यांवर महोत्सवाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Video : आता तुमच्या दारात येणार सलून व्हॅन, पुणेकर मायलेकींची भन्नाट आयडिया
नोंदणी शुल्क किती? सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क 800 रुपये इतके असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य व विद्यार्थी यांसाठी हे शुल्क 600 रुपये इतके आहे. 21 व्या पिफसाठी जागतिक स्पर्धा विभागात निवड झालेले चित्रपट पुढीलप्रमाणे - क्लॉन्डाईक - परफेक्ट नंबर - थ्री थाऊजंड नंबर्ड पिसेस - द ब्लू काफ्तान - मेडीटेरियन फिव्हर - एविकष्ण - मिन्स्क - वर्ड - बटरफ्लाय व्हिजन - तोरी अँड लोकिता - अवर ब्रदर्स - व्हाईट डॉग - बॉय फ्रॉम हेवन - हदिनेलेंतू