रायचंद शिंदे, जुन्नर, 17 फेब्रुवारी : कधी कुठे काय घडेल याचा विचारही आपण करु शकत नाही. रोज नवनवीन घटना समोर येत असतात. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बैलगाड्याचे 2 बैल चक्क घरावर चढल्याचा हा प्रकार समोर आला असून यामुळे आजूबाजूला एकच खळबळ पहायला मिळाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे गावात बैलगाड्याचे 2 बैल चक्क घरावर चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव होता यावेळी बैलगाडा घाटात शर्यतीची बारी झाल्यानंतर हे बैल घाटाबाहेर पडले. यानंतर चक्क एका घरावरती चढले. या प्रकारामुळे आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले.
दोन्ही बैल घरावर चढले आणि काही वेळातच या घरावरचा एक सिमेंट पत्रा फुटून एक बैल घरात खाली कोसळला. सुदैवाने हा बैल किरकोळ जखमी झाला असून या दोन्ही बैलांना सुखरूपाने वाचवण्यात बैलगाडा मालकाला यश आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक खाली कोसळलेल्या बैलाला बाहेर काढतात आणि घरावरील बैलालाही खाली घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, असे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतात. सोशल मीडियावर तर असे व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. सध्या जुन्नरमधील हा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधत असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.