पुणे, 28 जानेवारी : ‘आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित लढल्या तरी 150 जागा येतील आणि आम्ही मविआसोबत मिळून लढलो तर 200 जागा आरामात जिंकू, सी व्होटरचा सर्व्हेही तेच सांगतोय. म्हणूनच आता दोन्ही काँगेसनी ठरवायचं आपण चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचे ते’ असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सल्लाच दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडीमधील नाराजीवर भाष्य केलं. शरद पवारांसोबतचे मतभेद मी केव्हाच सोडून दिले आहेत. त्यामुळे मविआने सोबत जाताना माझ्या बाजुने तरी कोणताही किंतु परंतु नाही तसंच जेव्हा आम्ही सेनासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच असं ठरवलंय की एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही हे तारतम्य पाळावं, असा सल्लाही आंबेडकरांनी संजय राऊत यांना दिला. दरम्यान ईडी, सीबीआय, आयटी या तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भितीपोटी 500 कोटीच्या वर मालमत्ता असलेल्या तब्बल 7 लाखाच्या कुटुंबीयांनी देश सोडल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ठाकरे गट, वंचितच्या युतीवर पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया तर, काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमने-सामने आल्याचंही पहायला मिळालं. आता वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका आहे, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीने सर्व निवडणुका या एकत्र लढाव्यात अशी आमची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत अजून काहीही ठरलं नाही. मात्र युतीबाबत वंचित बहुजन आघाडी आणि आमची अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.