पुणे, 29 मार्च : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील मोठा नेता गेल्याची खंत अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी फडणवीस म्हणाले की, गिरीष बापट हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. लढवय्ये असलेले गिरीष भाऊ आजारातून बरे होतील असे आम्हाला वाटत होते परंतु त्यांना शरिराने साथ दिला नाही. गिरीष भाऊंनी राज्यातील भाजप वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांनी खासदार आमदार आणि पुण्यातील नगरसेवक काळात अत्यंत हुशारीने काम केल्याने त्यांच्या कामाची नेहमी चर्चा व्हायची.
Girish Bapat Death : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन
माझ्यासोबत मंत्रीमंडळ काळात काम करताना त्यांनी ज्या प्रकारे ते काम करायचे ते अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या मृदू स्वभावाने कितीही आणीबाणीची स्थिती झाली तरी ते त्यातून आम्हाला बाहेर काढायचे. पुणे शहराच्या विकासात त्यांनी मोठी क्रांती केली असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
गिरीष भाऊ अमरावतीत असलेल्या शेतीत ते नेहमी रमायचे कारण त्यांचे शेतीकडे चांगले लक्ष असायचे. गिरीष बापट यांच्यासारखा लढवय्या नेता गेल्याने भाजपची नभरून येणारी हानी आहे. त्यांनी पुण्याच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. विरोधकालाही कशापद्धतीने हाताळायचे याचा देखील त्यांच्याकडे चांगला अभ्यास होता म्हणून त्यांनी राज्यभर आपलं नाव केल्याची भावना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
स्वयंसेवक ते खासदार, लढवय्या गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती.
आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.