पुणे, 11 नोव्हेंबर : लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून वावरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना किरकठवाडी परिसरात लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची, अनेकांना फसवत असल्याची व तो किरकटवाडी येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यांमार्फत मिळाली होती.
त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, पोलीस नाईक काशिनाथ राजापुरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिता माने यांनी तोतया लष्करी अधिकारी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
अंकित कुमार सिंह( वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर आमरोह उत्तर प्रदेश)असे ताब्यात घेण्यात आलेल्या तोतया अधिकार्याचे नाव असून त्याची तो सांगत असलेली पत्नी मीनाक्षी हीसही ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडून दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल,एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराचं चिन्ह असलेली टोपी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी आरोपी अंकित कुमार सिंह यास हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.