बारामती, 6 फेब्रुवारी : बारामती मतदारसंघाचं नाव बदलावं अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. बारामती मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामती शहराचा विकास होतो का? असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. पुरंदर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचं काय? असंही शिवतारे यांनी विचारलं आहे.
बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बारामती मतदारसंघांचं नाव बदलून पुणे दक्षिण करा, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे.
'बारामती लोकसभा मतदारसंघांचं नाव बदलून पुणे दक्षिण करावं, कारण बारामतीच्या नावाखाली आपण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जा. बारामतीचा विकास म्हणजे फक्त बारामती विधानसभेचा विकास आहे का? तुम्ही पुरंदरला, दौंडला, भोरला काय विकास केला आहे? तुम्हाला जे पाहिजे ते केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे प्रकल्प बारामतीमध्ये हवे आहेत,' अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.
'राज्य सरकारचं मेडिकल कॉलेज द्यायचं ठरलं होतं, तेव्हा जी चार-पाच मेडिकल कॉलेज महाराष्ट्रात दिली गेली, तेव्हा भोरला का नाही घेतलं? दौंडला रेल्वे कनेक्टिविटी आहे तिकडे का नाही घेतलं?,' असा प्रश्नही विजय शिवतारे यांनी विचारला आहे.
'बारामती लोकसभा मतदार संघाचा विकास म्हणजे फक्त बारामतीचा विकास होतो का..? पुरंदर, दौंड.. इतर विधानसभा मतदारसंघाचं काय? ईएसआयसीचं हॉस्पिटल बारामतीत मंजूर झालं. बारामती हा कोपरा. चाकण तळेगावच्या कामगाराने इथं यावं का ? जिल्ह्याचा प्रकल्प बारामतीपुरता मर्यादीत ठेवायचा. पुरंदर विमानतळाशेजारी हे हॉस्पिटल का केलं नाही? खेड शिवापूरच्या बोगद्यातून बाहेर पडलं तर कित्येक जागा, तिकडे का नाही केलं हॉस्पिटल? बारामतीचा द्वेष नाही. तुम्ही मध्यवर्ती ठिकाण निवडले पाहिजे होते. मेडीकल कॉलेज पण बारामतीतच. इतर तालुक्यांमध्ये का नाही केलं? विकासात विषमता का करता? इतर तुमचे मतदार नाहीत का?' असे सवाल विजय शिवतारे यांनी विचारले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Sharad Pawar