पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार... काय बंद? जाणून घ्या

पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार... काय बंद? जाणून घ्या

पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर याबाबतची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 10 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान पुणे शहरात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनविषयी माहिती दिली आहे.

'पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,' असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

'मान्य आहे की हे लॉकडाऊन अडचणीचं आहे, पण परिस्थिती बघता ते करावं लागत आहे,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात अजित पवार 'इन अ‍ॅक्शन'

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देश पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी दिले आहेत.

'पुण्याच्या ग्रामीण भागातही खबरदारी घ्या'

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहर तसेच लगतच्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात तसेच ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

अजित पवारांसोबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळत आहे, त्या संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून शहरानजीकच्या गावातील वाढता संसर्ग विचारात घेत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Published by: Akshay Shitole
First published: July 10, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या