रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘संघ’ सरसावला, 8 हजार बॉटल्स रक्त गोळा करणार

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘संघ’ सरसावला, 8 हजार बॉटल्स रक्त गोळा करणार

कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट दूर करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक 540 वस्त्यांमध्ये 394 आपात्कालीन मदत केंद्रातून मदत करत आहेत.

  • Share this:

पुणे 04 एप्रिल : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. रक्तदानासाठी माणसेच पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्त जमा होत नाही. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला आहे. संघ आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे विभागात मोठे रक्तसंकलन अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार 23 जून 2020 पर्यंत सुमारे आठ हजार रक्तपिशवी संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हे रक्तदान अभियान प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस शनिवार व रविवारी होणार आहे. त्याकरिता पुणे पोलिसांच्या मदतीने जनकल्याण रक्तपेढीने रक्तदात्यांना पत्र उपलब्ध करुन दिले आहेत. उन्हाळयात कायम रक्तपेढीमध्ये रक्तसंकलनावर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे रक्त व रक्तघटकांची गरज भासणाऱ्या रुग्णांना ते उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातच कोरोना विषाणूच्या साथीचे आव्हान निर्माण झाल्याने ठरलेली रक्तदान शिबिरे रद्द झाली आहेत. यामुळे जनकल्याण रक्तपेढीने आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी न करता रक्तपेढीत रक्तदान करण्याची तयारी केल्याची माहिती रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट दूर करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक 540 वस्त्यांमध्ये 394 आपात्कालीन मदत केंद्रातून मदत करत असल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे. मदत कार्यात सहभागी झालेल्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हे वाचा - लॉकडाउनचा सर्वात मोठा चमत्कार! सकाळी क्षितिजाजवळ दिसलं कधीही न पाहिलेलं दृश्य

या आपदा केंद्रांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक संघाचे प्रशिक्षित स्वयंसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांचे संपूर्ण नियोजन ऑनलाइन बैठकांद्वारे होते आहे. त्यामुळे एकमेकाला न भेटता ही मदतकार्य पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं संघाने म्हटलं  आहे.

हे वाचा - मृत्यू समोर दिसत असतानाही 90 वर्षांच्या आजीने व्हेंटिलेटर दिलं तरूण रूग्णाला

बेघर, असंघटित क्षेत्रातील मजुर, कामगार अशांच्या भोजनाची व्यवस्था करणे, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एकटे रहाणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत जेवणाचे डबे, औषधी पुरवणे, गरजू कुटुंबांना शिधावाटप या व अशा विविध गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येत असल्याची माहितीही संघाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

 

First published: April 4, 2020, 7:46 AM IST
Tags: RSS

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading