पुणे, 16 मे: महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना कोरोनाचा विळखा पडला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात कोरोनाच्या भीतीने एका तरुणानं आत्महत्या केली आहे. मृत्यूनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
हेही वाचा..धक्कादायक! संपर्क साधूनही आली नाही अॅम्ब्युलन्स, पुण्यात एकाचा रस्त्यावर मृत्यू
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 24 वर्षीय तरुणाला सर्दी, खोकला आणि ताप होता. त्यामुळे या तरुणाला कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने त्याने गुरुवारी (14 मे) हॉस्पिटलच्या बिल्डिंगवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्याला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याची भीती होती. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
अशी साधली वेळ...
कोरोना संशयित रुग्णाने रात्री वीज गेल्याची संधी साधत हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. तसेच तरुणाचा कोरोना तपासणीचा अहवाल शुक्रवारी (15 मे) येणार होता. मात्र, त्याला कोरोनाची भीती सतावत होती. यामुळे तो अस्वस्थ होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 4 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास काही दिवसच बाकी असताना पुण्यातील रुग्णसंख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती. यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आदेशित केले आहे.
हेही वाचा...राज्यात घरपोच मद्यविक्रीला सुरुवात, पहिल्याच दिवशी मिळाला तुफान प्रतिसाद
राज्यातील कोव्हिड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. कोव्हिड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.