पुणे, 29 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ’ मातोश्रीतून बाहेर पडा’ असा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याचा दौरा करणार असं निश्चित झालं होतं. त्यानुसार आता उद्धव ठाकरे हे उद्याच पुण्याचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या गुरुवारी पुणे दौऱ्यावर निघणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील. त्यानंतर साधारणपणे 11.30 वाजेच्या सुमारास ते पुण्यात दाखल होती. पुण्यात आल्यानंतर पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेणार आहेत. यावेळी बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. बैठकीत विभगीय आयुक्त तसंच पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी 5 वाजता मुंबईकडे निघतील, असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे, न्यूज18 लोकमतला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते. तसंच, राज्यात आता कोरोनाची परिस्थिती पाहता लोकांना भेटून त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा करावा, असा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे भाजपचे नेत्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, अशी टीका केली होती. अखेर या सर्व वादानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे हतबल झालेल्या पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांचा हा लॉकडाउनच्या काळातला पहिला दौरा नाही. याआधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि कोकणात अतोनात नुकसान झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाल्या भागाचा दौरा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.