पुणे/मुंबई, 28 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर वाईट वेळ येत असल्याचे चित्र आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबतच आता वांगे उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली आहे. 3 महिने काम करुन फक्त 66 रुपये शेतकऱ्याच्या हातात आल्याने आता शेतकऱ्याने जगावं तरी कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेतही दिवसाला 256 रुपये रोजाने वर्षातील 100 दिवस काम मिळते. 90 दिवस रोजगार हमी योजनेत काम केले तर 23 हजार 40 रुपये मिळतात. त्यात दोन्ही नवरा बायकोने काम केले तर 46 हजार 80 रुपये मिळाले असते. मात्र, त्या तुलनेत वांगा उत्पादक शेतकऱ्याच्या हाती 3 महिने काम करुन 100 किलो वांग्यासाठी फक्त 66 रुपये आले आहेत. पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे या शेतकऱ्याला 100 किलो वांग्याला फक्त 66 रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथेच वांग्याची विक्री करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. शेतीमाल कवडीमोलाने विकला जात असल्याने आता बळीराजाने आता जगायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकरी नाना तिवटे यांनी त्यांच्या शेतामध्ये 11 गुंठ्यांमध्ये वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी चांगली खते आणि औषधी वापरून पीकही चांगल्या पद्धतीने काढले होते. हे 100 किलो वांग्याचे पीक विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आणण्यात आले. मात्र, त्या पिकाला योग्य बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून 100 किलो वांग्याना फक्त 66 रुपये मिळाले आहेत. तिवटे यांनी काढलेल्या वांग्याच्या उत्पादनाच्या काढणीचाही खर्च या पैशातून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने अपसिंगा कांदा उत्पादक गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी कांद्याची शेती कुळवून टाकली. उस्मानाबाद मधील अपसिंगा गाव कांद्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. अपसिंगा गावात 1480 हेक्टर जमीन वर कांदा लागवड केली आहे. उस्मानाबादमधील परिस्थितीही भीषण - सध्या कांद्याला कवडीमोल भावाने विकला जात असल्याने अपसिंगा गावातील श्रीहरी भाकरे या शेतकऱ्याने कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही, म्हणून आपल्या शेतातील तीन एकर कांदा कुळवण टाकला. तसेच कुळवण्यासाठी ही ट्रॅक्टरच्या खर्चासाठी उसनवारी केलली असून तीन एकर कांदा कुळवण्यासाठी त्यांना 2400 रुपये खर्च आला आहे. कांदा कुळवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले होते. आपल्या हृदयावर दगड ठेवून भाकरे यांनी कळूवून टाकला असल्याचे भाकरे यांनी सांगितले.
500 किलो कांद्यामागे 2 रुपये भाव मिळत असल्याने कांदा शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी आता जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जगात कांद्याला सोन्याचा भाव - राज्यात कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. मात्र, याच कांद्याला परदेशात सोन्याचा भाव मिळत आहे. अनेक देशांमध्ये कांदा तब्बल 750 टक्क्यांनी महाग झाला आहे. फिलिपाईन्समध्ये कांद्याचा भाव 2.5 हजार रुपये किलोपर्यंत गेला आहे. तर भूकंपग्रस्त तुर्कीपासून पाकिस्तान, कजाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कांदा जनतेला रडवित आहे. महिनाभरात भारतात कांद्याचे दर सरासरी 30 टक्क्यांनी घटले आहेत. तर जगातील अन्न टंचाईचे प्रतिनिधित्व कांदा करतोय. अनेक देशांमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी दरवाढ दिसत आहे. अनेक देशांमध्ये जेवणातून कांदा हद्दपार झालेला दिसत आहे.