पुणे, 6 जून : पुण्यालगत असलेल्या 4 गावांना सील करण्याच्या निर्णयानंतर गावांच्या वेशीवर नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. नोकरीसाठी बाहेर जाऊ इच्छिणारे नोकरदार आणि पोलिसांमध्ये वाद वाढले होते. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. वेशीवर गाड्या अडवणाऱ्या पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच तू तू मैं मैं होत असल्याचंही पाहायला मिळालं. मोटारसाइकस्वार नागरिक पोलिसांना गावात जाऊ देण्याची विनंती करतानाचा एक व्हिडिओही समोर आला. या व्हिडिओमध्ये संतापलेल्या महिलेनं थेट पोलिसांनाच ‘मला घरी जाऊद्या…मी काय इथं रस्त्यावर राहू का?’ असा सवाल केला.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतरही पुण्यालगतची ही गावं सील केल्याने नोकरदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब ‘न्यूज 18 लोकमत’ने प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर नऱ्हे, मांजरी, वाघोली आणि कदमवाकवस्ती गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द करावा लागला.