प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 1 जून : एखाद्याला अपंगत्व येताना ते त्याच्या शरीराला येतं, मनाला नाही. मनाने जर ठरवलं तर अपंगत्वाच्या सर्व मर्यादा ओलांडून सत्य-असत्यतेच्या सर्व शक्यता मोडीत काढता येतात. जबरदस्त इच्छाशक्ती आणि मनाची ताकद यांच्या जोरावर अपंगत्वाशी संघर्ष करत समाजाला प्रेरणा देणारे यश मिळवता येते. पुण्यामध्ये राहणार्या 44 वर्षीय विशाल रणपिसे यांनी हे दाखवून दिले आहे. शरीराला जडलेल्या अनेक व्याधी, वेगवेगळे त्रास, कष्टप्रद आयुष्य या सगळ्यावर मात करून शिक्षणाचा ध्यास कायम ठेवत त्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. त्यांची कहाणी स्फूर्ती देण्यासोबतच प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. शिक्षणासाठी केली आजारांवर मात वय वर्ष 44 असणाऱ्या विशाल रणपिसे यांचे आठवीपर्यंतच शिक्षण झाले होते. पुढे समाजकार्यात, कामाधंद्यात आणि त्यानंतर संसारात अडकल्यामुळे पुढचे शिक्षण राहून गेले. परंतु अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे असे त्यांनी ठरवले आणि 2018 साली रात्र प्रशालेत नववीमध्ये ॲडमिशन घेतले. त्यानंतर दहावीमध्ये शिकत असताना मात्र त्यांना पॅरालिसिस अटॅक आणि ब्रेन अटॅक आला. या आजारामध्ये ते 1 वर्ष बिछान्याशी खिळून होते. परंतु शिकण्याची जिद्द त्यांना शांत बसून देत नव्हती.
प्रकृतीचं अस्वास्थ्य आणि अपंगत्व असूनही अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी दहावी तर पूर्ण केलीच पण अकरावी आणि बारावीसुद्धा पूर्ण केली आहे. नुकताच निकाल जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये विशाल रणपिसे हे उत्तम 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेतील सरस्वती रात्र शाळेत त्यांनी शिक्षण मिळवत हे यश मिळवले आहे. शिक्षणाच्या ध्यासामुळे मुलांनाही स्फूर्ती चालताना आणि बोलताना त्रास होणे, जड वस्तू उचलता न येणे, फार वेळ उभे राहिल्यावर चक्कर येणे अशा प्रकारच्या व्याधी त्यांना आहेत. विशाल रणपिसे यांच्या कुटूंबामध्ये त्यांच्याशिवाय त्यांचा मोठा मुलगा आणि एक लहान मुलगी आहे. त्यांची बायको दहा वर्षापूर्वीच वारली. मुलगा नोकरी करून घरखर्च सांभाळतो तर मुलगी एका क्लिनिकमध्ये पार्ट टाईम रिसेप्शनिस्टचे काम करते. कुटूंबासाठी सगळेच कष्ट उपसत असल्यामुळे आम्ही एकमेकांची प्रेरणा होतो. माझ्या शिक्षणाच्या ध्यासामुळे मुलांनाही स्फूर्ती मिळाली आहे, असे विशाल रणपिसे यांनी सांगितले. अपंगत्व येण्याआधी त्यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे पुढे शिकून समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे.
Jalna News : भले शाब्बास! 12 वर्षानंतर दिली बारावीची परीक्षा, निकाल असा लागला की सगळेच करतायत कौतुक
बारावीपुढे शिकण्यासाठी ही आहे अडचण बारावीनंतरच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी कोणी नाही. मला मिळालेली 36 टक्के ही अपंगत्वाची टक्केवारी पुढील शिक्षणासाठी पुरेशी नाही, म्हणून मला 40 टक्केवारी मिळावी अशी प्रशासनाकडे मागणी आहे, जेणेकरून मला पुढील शिक्षण घेऊन समाजासाठी आणि मुलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनता येईल, अशा शब्दांत रणपिसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Nagpur News: सलाम तिच्या जिद्दीला! घर, नोकरी सांभाळून 38 व्या वर्षी बारावी पास, Video
वैद्यकीय असहकाऱ्यामुळे बारावीनंतरच्या शिक्षणासाठी आवश्यक ती अपंगत्वाची टक्केवारी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर्सना माझ्यासोबतच माझ्यासारख्या अनेक अपंगांच्या रिपोर्ट्सचा बारकाईने अभ्यास करून अपंगत्वाची योग्य टक्केवारी द्यावी अशी मागणी करण्यासाठी मी येत्या 5 जूनपासून उपोषणाला बसणार आहे, असेही विशाल रणपिसे यांनी यावेळी स्पष्ट केले.