राजस्थानचा रेडा 'राजा' सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी दूरदूरहून शेतकरी येतात. या रेड्याचं केवळ रूप रुबाबदार नाही, तर त्याच्या वीर्यालाही संपूर्ण देशात मागणी आहे.
या साडेतीन वर्षीय महाकाय रेड्याची उंची 5 फूट 8 इंच असून त्याचं वजन सुमारे 1300 ते 1400 किलो आहे. रुबाबदारपणामुळेच मालकांनी त्याचं नाव 'राजा' असं ठेवलंय.
राजाच्या वीर्याला संपूर्ण देशात मागणी असली तरी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये ते मोठ्या प्रमाणावर विकलं गेलं आहे. त्याचे मालक म्हणतात, वीर्य विक्रीमुळे पुढील वर्षापर्यंत केवळ राजस्थानात राजाचे जवळपास 8000 बाळ जन्माला येतील. तर, हरियाणा आणि पंजाबमध्ये मिळून राजा 11000 बाळांचा बाप होईल.
राजाच्या देखभालीसाठी मालकांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्याला दररोज सकाळ, संध्याकाळ 4-4 लिटर दूध दिलं जातं. जेवल्यानंतर 3 ते 4 किलोमीटरवर त्याला फिरायला घेऊन जावं लागतं. चुरू जिल्ह्यातील बीसलाण गावात वाढणाऱ्या या राजाचे आई-वडीलही प्रसिद्ध होते. त्याची आई दिवसाला 24 किलो 800 ग्रॅम दूध द्यायची.
उदयपूरच्या कृषी उत्पन्न बाजार संकुलात सुरू असलेल्या किसान महोत्सवात राजा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.