पावसाने सुरुवातीच्या काळात दांडी मारल्यामुळे सगळ्याच भाज्या महागल्या आहेत. त्यात टोमॅटोनेतर सगळ्याच हद्दीपार करत. आता सध्या टोमॅटो 130 ते 150 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. यामुळे गृहिणींचं बजेट आता कोलमडलं आहे. गृहिणी टोमॅटोला पर्याय म्हणून इतर गोष्टींकडे पाहात आहेत.
गृहिणीच काय भाजीवाले देखील एकही टोमॅटो चोरीला जाऊ नये किंवा वाया जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यानं एक भन्नाट कल्पना राबवलीय.
आपला टोमॅटो चोरीला जाऊ नये, तसेच सर्वांवर लक्ष रहावं म्हणून हावेरीतल्या अक्की अलुरू गावातल्या शेतकऱ्यानं त्याच्या टोमॅटोच्या सुरक्षेसाठी एक भन्नाट युक्ती केलीय. ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मुट्टपा नावाच्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतातले टोमॅटो बाजारात विकायला आणलेत. त्याचबरोबर एक सीसीटीव्ही कॅमेराही आणलाय. फुटपाथवरच्या भाजीच्या स्टॉलवर त्यानं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलाय. ज्यामुळे त्याची काही फसव्या ग्राहकांकडून लूट होणार नाही.
टोमॅटोच्या ढिगामागेच त्याने हा कॅमेरा बसवलाय. त्याला बॅटरी जोडलेली आहे. “बाजारात सगळ्यात चांगले टोमॅटो माझ्याकडे मिळतात. त्यामुळे ते घेण्यासाठी ग्राहक इथे येतात; पण इतर ग्राहकांना माल विकत असताना काही ग्राहक टोमॅटो चोरतात. सध्या मला स्वतःचं थोडंही नुकसान करून घ्यायचं नाही. त्यामुळे मी सुरक्षेसाठी हा कॅमेरा लावला आहे,” असं मुट्टप्पा यांनी सांगितलं.
दरम्यान, बेलूरजवळच्या हसन जिल्ह्यातल्या गोणी सोमनहळ्ळी गावातल्या एका टोमॅटो उत्पादकाला चोरीचा चांगलाच फटका बसलाय. छान पिकलेल्या टोमॅटोंची काढणी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं; मात्र त्याच्या आदल्या रात्रीच काही चोरांनी टोमॅटोच्या 50-60 पिशव्या चोरल्या आणि शेतकऱ्याचं काही लाखांचं नुकसान केलं.