राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान शिमोगामधील तीर्थहल्ली शहारातील कुवेम्पू स्कूल मतदान केंद्रामध्ये चक्क नागराजानं दर्शन दिलं आहे.
शहराच्या मध्यभागी असलेलं हे मतदान केंद्र आहे. मतदान सुरू असताना अचानक मतदान केंद्रात नाग घुसल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली.
अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती स्थानिकांना दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मास्टर मारुती घटनास्थळी पोहोचले, त्यांनी सापाला पकडून सुखरूप जंगलात सोडले.
दुसरीकडे यादगिरी येथील एका मतदान केंद्रावर माकडांनी धुडूगूस घातला आहे. माकडांच्या उपद्रवामुळे निवडणूक अधिकारी हैराण झाले आहेत. यादगिरी जिल्ह्यातल्या वडगेरा तालुक्यातील ही घटना आहे.
हुबळीमध्ये तर चक्क मांजराने सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावली. लॅमिंग्टन शाळा मतदान केंद्रावरील ही घटना आहे. मतदारांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या खुर्चीवर ही मांजर येऊन बसली. मतदानासाठी नागरिक आल्यानंतरही ही मांजर जागची हालली नाही.
एका मतदान केंद्रावर तर चक्क एक महिला पूजेचं ताट घेऊन पोहोचली. तीला ईव्हीएमची पूजा करायची होती. परंतु अधिकाऱ्यांनी मज्जाव केल्यानंतर ही महिला मतदान केंद्रांच्या दरवाजाचे पूजन करून परतली.
या निवडणुकीदरम्यान अशा अनेक विचित्र घटना घडत आहेत, मात्र मतदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.