माश्यांचं कालवण, तळलेले मासे, सुक्के मासे जवळपास सर्वांनाच आवडतात. त्यामुळे 'मत्स्यपालन' हा मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. 'चितळ' या अमेरिका आणि बांगलादेशात आढळणाऱ्या माश्याला बाजारात प्रचंड मागणी असते. त्यामुळे हा दुर्मिळ प्रजातीचा मासा कमी काळात मोठा नफा मिळवून देतो.
तलावात जमिनीच्या तळाशी राहणाऱ्या या माश्याला गोड्या पाण्यातील मासा असंही म्हणतात. त्याच्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. तो कोळंबीसारखे लहान मासे खातो. दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये 14 किलो वजनाचा महाकाय चितळ आढळला होता.
दंतनच्या झिनुक पलासिया भागातील रहिवासी उत्तम रॉय आणि बच्चू रॉय या दोन मच्छीमारांनी सुवर्णरेखा नदीत एकत्र जाळं टाकलं होतं. दोघांच्याही जाळ्यात भलामोठा चितळ अडकला. दोघांनी प्रचंड मेहनतीने, मोठ्या ताकदीने जाळं वर खेचलं आणि पाहताच क्षणी त्यांना धक्का बसला.
हा 5 फूट 5 इंच आकाराचा माणसाएवढा भलामोठा मासा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. प्रजननासाठी तो याठिकाणी आला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला.
एवढा मोठा चितळ चवीला कसा असेल. त्याचा आकार पाहून त्याच्यात अख्खं गाव जेवण होईल, अशा चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगल्या होत्या. त्यांनी त्याला 'राघव चितळ' असं नाव दिलं.