नेहरू गार्डनच्या ओपन जिममध्ये अनेक तरुण व्यायामासाठी येत असतात. ही जिम परिसरात प्रसिद्ध आहे. येथे व्यायाम करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागायचं. परंतु आता मात्र इकडे कोणी भटकतही नाही, अशी परिस्थती आहे. याचं कारण म्हणजे व्हायरल व्हिडिओ.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत या जिममधील चेस्ट प्रेस मशीन टेबल रात्रीच्या अंधारात आपोआप हलताना दिसतंय. वाऱ्याची झुळूक आली की, एखादी वस्तू हलताना दिसू शकते. मात्र हे मशीन टेबल अशाप्रकारे हलतंय की, त्यावर कोणी व्यायाम करतंय की काय...असा प्रश्न पडावा.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या जिममध्ये भुताटकी असल्याचा संशय व्यक्त केला. रात्री जिममध्ये भूत येऊन व्यायाम करतात, असंही अनेकांनी म्हटलं.
परिणामी लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ते आता बागेत जायलासुद्धा घाबरतात. त्यांचे पालकही त्यांना पाठवत नाहीत. त्यामुळे मागील तीन-चार दिवस बाग आणि जिम दोन्ही सुनसान झालेत.
स्थानिकांनी मात्र हा भुताटकीचा दावा फेटाळून लावला आहे. 'आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर हा व्हिडिओ आला होता. त्यामुळे आम्ही खात्री करून घेण्यासाठी जिममध्ये जाऊन त्या मशीनवर व्यायाम करून पाहिलं, व्यायाम करताना मशीनची होणारी हालचाल आणि व्हिडिओमधील हालचाल, दोन्हीमध्ये साम्य नव्हतं. त्यामुळे हा व्हिडिओ खोटा आहे', असं स्थानिकांनी म्हटलं आहे.